वरपगाव : मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई यासारख्या मोठ्या महानगरांंची तहान भागविणार्या कल्याण तालुक्यातील बारमाही वाहणार्या उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार नद्यांपैकी काळू ही नदी ऐन उन्हाळ्यात कोरडी पडल्याने आजूबाजूंच्या गावांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तर नदी पात्रातील पाण्याची लेव्हल खूपच कमी झाल्याने कल्याण-डोंबिवली पालिकाही उल्हास नदीतील मोहिली प्लाँटमधून पाणी उचलून काळू नदीकडे वळविण्याच्या प्रयत्नात असून रस्ते काँक्रीटकरणामुळे त्यामध्ये अडचणी येत असल्याचे अधिकार्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातून बारमाही वाहणार्या उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार नद्यांवर १०२ गावे आणि ४९ पाडे पाण्यासाठी अवलंबून आहेत. यातील काळू नदीवर फळेगाव, रुंदा, आंबिवली, गुरवली, गुरवली पाडा, उशिद, हल, म्हसकल, अरिवली, बोडाखार, अनखर आदी १० ते १५ गावपाडे अवलंबून आहेत. शिवाय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका टिटवाळा येथून या नदीतून ३५ लाख लिटर पाणी उचलते. त्यामुळे काळू नदी पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. मात्र धरणांचा अभाव बेसुमार पाणीउपसा, पाण्याची चोरी यांमुळे मे महिन्याच्या प्रारंभच नदीने तळ गाठला. आता तर नदी कोरडी ठिक्कळ पडली आहे. केवळ जागोजागी डबकी दिसत आहेत. यामुळे आजूबाजूला गावपाड्यासह कडोंमपालाही टंचाईचा फटका बसू शकतो. (वार्ताहर)
उल्हास नदीचे पाणी काळू नदीकडे वळवणार?
By admin | Published: May 23, 2014 3:31 AM