मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली आहे. राणा दाम्पत्याविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणा दाम्पत्याला बंटी बबली उपमा देत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोघांचा समाचार घेतला. शिवसैनिक मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. राणा दाम्पत्यानं मातोश्रीबाहेर येऊनच दाखवावं, असं आव्हान शिवसैनिकांनी दिलं आहे.
राणा दाम्पत्य सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाण्यासाठी निघणार होते. मात्र त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येनं शिवसैनिक जमा झाले. त्यामुळे राणा दाम्पत्याला घराबाहेर पडताच आलं नाही. शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित असताना पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदीदेखील तिथे पोहोचल्या. हनुमान चालिसा पठण करण्यास आमचा विरोध नाही. मात्र ढोंगी हनुमान भक्तांना आमचा विरोध आहे. राणा दाम्पत्य बाहेर येत नाही, तोवर आम्ही त्यांच्या घराबाहेर बसून राहू, असं चतुर्वेदी म्हणाल्या.
राणा दाम्पत्याला आम्ही वडापाव खायला घालू. कोल्हापूर मिरचीनं त्यांचं स्वागत करू, असं प्रियंका चतुर्वेदींनी म्हटलं. राणा दाम्पत्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. त्यांनी घराबाहेर पडावं. मुंबई पोलीस त्यांचं काम करत आहेत, असंदेखील त्यांनी सांगितलं. राणा दाम्पत्य घराबाहेर आलं नाही, तर ते हनुमानाचे बोगस भक्त असल्याचं सिद्ध होईल. दोघांना बाहेर पडू द्या, आम्ही त्यांना योग्य रस्ता दाखवू, असं चतुर्वेदी यांनी राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान दिलं.
तेव्हा ठाकरे म्हणाले होते, आज माझ्यासाठी बहिण आलीयएप्रिल २०१९ मध्ये प्रियंका चतुर्वेदींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशाची आठवण चतुर्वेदींनी गेल्या वर्षी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती. 'मला तो दिवस, तो क्षण आजही आठवतो. आज माझ्यासाठी एक बहिण आलीय, असं त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते. तो क्षण भावुक करणारा होता. कारण मला पक्षानं पद दिलंय, ते राजकीय, प्रोफेशनल स्वरुपाचं आहे. पण बहिण हे नातं वैयक्तिक स्वरुपाचं आहे. जे सदैव कायम राहणारं आहे,' असं चतुर्वैदी म्हणाल्या. ही आठवण सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते.