Join us

मानखुर्दमधून ड्रग माफियांचा सफाया करणार; कोटेचा यांच्या वक्तव्यानंतर संजय पाटील यांचा पलटवार

By मनीषा म्हात्रे | Published: May 11, 2024 12:23 AM

कोटेचा यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा परराज्यांतून चोरवाटेने मानखुर्द शिवाजीनगरमध्ये दाखल होतो.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परराज्यातून अंमली पदार्थ आणणारे, त्याचा साठा करणारे आणि वितरित करणाऱ्यांची साखळी विशेषतः मानखुर्द - शिवाजी नगर येथून समूळ नष्ट करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी कोटेचा यांच्यावर आरोप करत, हिंदू मुस्लिम करून झाले, पाकिस्तान बनवत असल्याचा आरोप करूनही काही हाती लागले नाही म्हणून थेट ड्रग्जचा अड्डा बनत असल्याचे नाटक करून मतदार संघ बदनाम करत असल्याचे संजय पाटील यांनी म्हटले आहे.

कोटेचा यांनी म्हटले, महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा परराज्यांतून चोर वाटेने मानखुर्द शिवाजीनगरमध्ये दाखल होतो. तेथे तो साठवून ठेवला जातो आणि मागणीप्रमाणे मुंबईत सर्वत्र वितरित केला जातो. अंमली पदार्थांबाबत ही हेच केले जाते. या व अशा गुन्ह्यांशी, बेकायदेशीर कृत्यांशी येथील तरुण, विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे जोडले जात आहेत. आणि हीच तेथील पालकवर्गाची मुख्य खंत आहे. आपले पाल्य अमली पदार्थ, गुटख्यापासून दूर राहावे, गुन्हेगारीपासून लांब राहावे अशी इच्छा येथील प्रत्येक पालक व्यक्त करतो. परराज्यातून अंमली पदार्थ आणणारे, त्याचा साठा करणारे आणि वितरित करणाऱ्यांची साखळी ईशान्य मुंबईतून विशेषतः मानखुर्द - शिवाजी नगर येथून समूळ नष्ट करणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही साखळी उद्ध्वस्त झाली की अंमली पदार्थ आणि तंबाखूच्या आहारी गेलेल्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेही माझे कर्तव्य आहे, असा दावा कोटेचा यांनी केला.

यावर, संजय पाटील यांनी कोटेचा यांच्यावर निशाणा साधत, " त्यांच्याकडे मुद्दे राहिले नाही. आधी हिंदू मुस्लिम करून झाले. त्याच्या आधी मोदी-मोदी करून झाले. पहिले बोलले पाकिस्तान बनवू पाहत आहेत. त्यानंतर दगड मारल्याचा आरोप करत काहीना काही खोटे आरोप करत एका समुदायाला टार्गेट करण्यात येत आहे. दहा वर्ष तुमचीच सत्ता होती. तेव्हा का नाही लक्ष दिले. असे खरच सुरू असल्यास कारवाई करा. गुंडांचं अड्डा, ड्रग्स इकडे येतात आणि इकडून डिस्ट्रीब्यूट होतात यावर आधी लक्ष गेले नाही का?. आता निवडणूक आल्यामुळे झोप उडाली आहे. आपल्याला या भागात प्रतिसाद मिळत नाही म्हणून अशाप्रकारे बदनाम करु नका असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :संजय दिना पाटील