मुंबई : कोरोनामुळे सर्वच आघाड्यांवर प्रचंड नुकसान सोसावे लागत असले तरी या संकटामुळे देशात ‘वर्क फ्रॉम होम’ची संस्कृती मोठ्या प्रमाणात रुजेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांतील महागड्या घरांच्या मागणीत लक्षणीय घट होईल आणि सभोवतालच्या छोट्या शहरांतील मोठ्या आकाराच्या आणि परवडणाºया घरांची मागणी वाढेल, असे भाकीत व्यक्त केले जात आहे.
मुंबई शहरात एक हजार चौरस फुटांचे दोन बीएचके घर विकत घ्यायचे ठरवल्यास त्याची सरासरी किंमत १ कोटी ८५ लाखांवर जाते. तर, मुंबई, ठाण्यापलीकडच्या शहरांमध्ये तेवढ्याच आकाराचे घर साधारणत: ५५ ते ६० लाखांपर्यंत मिळू शकते. मुंबईत तेवढ्याच क्षेत्रफळाचे घर भाड्याने घ्यायचे ठरल्यास मासिक ४५ हजार रुपये मोजावे लागतात. तर, छोट्या शहरांत हे भाडे १२ हजार ५०० रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे मुंबईतील अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड, कांदिवली, चेंबूर, वडाळा, घाटकोपर, विक्रोळी, पवई, मुलुंड या भागात घर विकत किंवा भाड्याने घेण्याऐवजी कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, उलवे, तळोजा, मीरा-भार्इंदर या भागात घर घेण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी शक्यता अॅनरॉक प्रॉपर्टीज या प्रख्यात सल्लागार संस्थेने व्यक्त केली आहे. भाडेतत्त्वावरील घरांपेक्षा स्वत:च्या मालकीचे घर असावे अशी मानसिकता कोरोना काळानंतर वाढू लागली आहे. महानगरांनजीकच्या छोट्या शहरांमधील परवडणाºया आणि जास्त क्षेत्रफळाच्या घरांची मागणी वाढेल, असे मत अॅनरॉक प्रॉपर्टीजच्या अनुज पुरी यांनी व्यक्त केले आहे.दहा वर्षांच्या भाड्यात स्वत:चे घर येईलएक हजार चौरस फुटांच्या घरात पाच वर्षे भाडेतत्त्वावर राहायचे असेल तर २८ लाख ६६ हजार रुपये खर्च होतील. त्यात आणखी तेवढ्याच रकमेची भर टाकल्यास छोट्या शहरांमध्ये स्वत:च्या मालकीचे घर खरेदी करणेही शक्य असल्याचा ताळेबंद अॅनरॉकने आपल्या अहवालात मांडला आहे. वर्क फ्रॉम होम या पद्धतीनेच काम करायचे असेल तर लोक दूर अंतरावरील शहरांमध्ये जास्त मोठ्या जागेत वास्तव्य करण्यास तयार होतील. घर खरेदी किंवा भाड्यापोटी होणाºया त्यांच्या खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत होईल. हे भाकीत मोठ्या प्रमाणात खरे ठरले तर मुंबई शहरातील घरांचा वधारणारा ‘भाव’ खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.