Join us

शिवसैनिक म्हणून काम करणार - ऊर्मिला मातोंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:15 AM

शिवसैनिक म्हणून काम करणारऊर्मिला मातोंडकर : मातोश्री येथे रश्मी ठाकरेंनी बांधले शिवबंधनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेत्री ...

शिवसैनिक म्हणून काम करणार

ऊर्मिला मातोंडकर : मातोश्री येथे रश्मी ठाकरेंनी बांधले शिवबंधन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला. कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे. कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सगळ्यांना समजावत आहेत, त्यांच्या कामामुळे प्रभावित झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी इच्छा आहे, असे मातोंडकर यांनी प्रवेशानंतर माध्यमांना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ऊर्मिला यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. रश्मी ठाकरे यांनी ऊर्मिला यांच्या हातावर शिवबंधन बांधले. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना ऊर्मिला यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेना प्रवेशासाठी कोणतीही गोड सक्ती नव्हती. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने वाखाणण्याजोगी कामगिरी केली आहे. गेल्या दहा महिन्यांत कोरोना, अतिवृष्टी अशा संकटांत चांगले काम केले आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला होता. महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. त्यामुळे विधान परिषदेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा, अशी मनोमन इच्छा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. या जागा आणि भवनापर्यंत जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे याचा दर्जा वाढवला पाहिजे. त्याकरता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांचे विचार मला त्या वेळी पटले. विधान परिषदेसाठी त्यांनी माझा विचार केला त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, असेही ऊर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

मला काँग्रेसने विधान परिषदेसाठी विचारले होते. पद किंवा प्रतिष्ठेबद्दल कुठलीही तक्रार नव्हती. पण वेगळ्या कारणांमुळे मी काँग्रेसची विधान परिषदेची ऑफर नाकारली, असेही मातोंडकर यांनी या वेळी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली. आपली त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले.

* शिवसेनेची महिला आघाडी भक्कम

शिवसेनेची महिला आघाडी खूप भक्कम आहे. मला शिवसेनेचा भाग झाल्याचा आनंद आहे. मुंबईत महाराष्ट्र आणि जगभरातून असंख्य मुली येतात. त्या इथे सुरक्षित असल्याचा आत्मविश्वास पालकांना असतो. या शहराचा भाग असल्याचा अभिमान आहे.

* मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही - ऊर्मिला मातोंडकर

ट्रोलरमुळे देशात विद्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत हीन पातळीवर ट्रोलिंग केले जाते. पण यांच्या ट्रोलमुळे मी योग्य मार्गावर असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांचे आरोप आणि ट्रोल मला पदकांसारखे आहेत. मला कितीही ट्रोल केले तरी मी मागे हटणार नाही. मी मराठी मुलगी आहे. मराठी पाऊल पुढे पडतच राहणार, असा इशारा त्यांनी भाजपच्या ट्रोलरला दिला.

---

* धर्मनिरपेक्षता म्हणजे इतरांचा द्वेष नव्हे

मी धर्मनिरपेक्ष किंवा हिंदू असणे म्हणजे आपलाच धर्म पुढे रेटणे नव्हे. मी जन्माने हिंदू आहे आणि कर्मानेही हिंदू आहे. आठ वर्षांची असताना मी योगाचा अभ्यास केला आहे. माझा हिंदू धर्माचा प्रचंड अभ्यास आहे, त्यामुळे मी हिंदू धर्मावर खूप बोलू शकते. एखाद्या पक्षाची प्रतिमा काय आहे यापेक्षा तो पक्ष जनतेसाठी काय करतो हे महत्त्वाचे आहे. ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सरकारने कोणत्याही एका धर्माचे लांगूलचालन केले नाही. त्यांनी सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यातच सर्व काही आले.

* बॉलीवूड हे मुंबईच्या रक्ताशी जोडलेले

बॉलीवूडची काळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न मधल्या काळात झाला. बॉलीवूड हे काही ४-५ स्टारचे नाही, जे तुम्हाला आवडत नाहीत. बॉलीवूडमध्ये असंख्य लोक काम करतात. बॉलीवूड हे मुंबईच्या रक्ताशी जोडलेले असून बॉलीवूड आणि मुंबई हे वेगळे होणार नाही, असे सांगतानाच कंगना रनौतला उत्तर नाही देणार. तेव्हाही टीका केली नव्हती, मुलाखतीदरम्यान ओघात उत्तर दिले होते, असे ऊर्मिलाने स्पष्ट केले

----------------------------