लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विरोधी आघाडीत ६४ घटक पक्ष आहेत. देशाचे नेतृत्व करू शकेल, असा नेता त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहराही नाही. तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारले असता, संजय राऊत यांच्यासारखे पोपटलाल म्हणतात की, आम्ही पाच वर्षांत पाच पंतप्रधान देऊ. ही निवड संगीत खुर्चीच्या माध्यमातून होणार का, असा खोचक सवाल करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. उत्तर पूर्वचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारासाठी विक्रोळी येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते.
इंडिया आघाडीचा खरपूस शब्दांत समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, इंडिया आघाडीच्या नेत्यांचे स्वतःचे स्वतंत्र इंजिन आहे. इंजिनात सामान्य माणसाला जागा नसते. राहुल गांधी यांच्या इंजिनात फक्त प्रियांका आणि सोनिया गांधी यांना जागा आहे. पवार यांच्या इंजिनात फक्त सुप्रिया सुळे यांना जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनात फक्त आदित्य यांना जागा आहे. सर्वसामान्यांना जागा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन असलेल्या ट्रेनमध्ये सर्वसामान्य माणसाला जागा आहे. यावेळी मनोज कोटक यांचे भाषण सुरू असताना, काही कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे आगे बढो’ अशा घोषणा दिल्याने थोडा तणाव निर्माण झाला होता.
उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. कोविड काळात लोक मरत असताना हे घोटाळे करत होते. सत्तेत असताना हे एकही प्रकल्प आणू शकले नाहीत. मुंबईतील मराठी माणसाला वसई-विरारला ढकलले, असे फडणवीस म्हणाले.
झोपडीधारकाला मिळणार हक्काचे घर
मुंबईत झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला फक्त घर द्यायच्या आहे. त्याच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. धारावीतील प्रत्येक झोपडीधारकाला त्याला त्याचे पक्के घर मिळेल. एवढेच नव्हे तर मुंबईतील प्रत्येक झोपडीधारकाला त्याला स्वप्नातील हक्काचे घर आम्ही मिळवून देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी साकीनाका येथील सभेत सांगितले.