Join us  

पुढची निवडणूक लढवणार का? नितीन गडकरी म्हणाले…

By मनोहर कुंभेजकर | Published: August 27, 2022 4:50 PM

मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार अशा उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या.

मनोहर कुंभेजकर

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार अशा उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र यावर भाष्य करत आपण पुढची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदवीदान

समारंभ संस्थेच्या अंधेरी पश्चिम, सी.डी. बर्फीवाला हॉल येथील मेयर हॉलमध्ये झाला, त्यावेळी मुख्य अथिती म्हणून गडकरी बोलत होते. “गेल्या 40 वर्षात मी कटआउट, बॅनर लावले नाही. कोणाला चहा पाणी दिले नाही. जनतेसाठी चांगली कामे केली. त्यामुळे जनताच मला निवडणुकीत मतदान करते,” हे त्यांनी स्पष्ट केले.

गेली 96 वर्षे कार्यरत असलेली अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मनुष्यबळ पुरवणाऱ्या या संस्थेच्या एलजीएस, एलएसजीडी, सॅनिटरी इन्स्पेक्टर, हॉस्पिटल मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट या विविध पदविका आभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी मंचावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक (निवृत्त प्रशासकीय अधिकारी) डॉ.जयराज फाटक, संस्थेचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, नियामक मंडळाचे सदस्य विजय साने, निवृत्त प्रशासकीय अधिकारी गोविंद स्वरूप, संस्थेच्या डॉ.स्नेहा पळणीटकर, उत्कर्षा कवडी,रवीरंजन गुरू आदी मान्यवर उपस्थित होते.

“देशातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून महानगर पालिका आणि नगरपालिकांची गुणवत्ता व कार्यपद्धती सुधारणे आणि त्या आर्थिक सक्षम करणे गरजेचे आहे.त् यासाठी रणजित चव्हाण व डॉ. जयराज फाटक यांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन गडकरी यांनी केले. या संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाकरिता, देशासाठी कसा होईल, टाकाऊ पासून त्याचे रूपांतर संपत्तीत कसे होईल यासाठी संशोधन करून नवीन संकल्पना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमलात आणणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

अमिताभ यांच्या जुहू येथील घरी आठ दिवसांपूर्वी आलो होतो. त्यावेळी दरवर्षी पावसाळ्यात आमच्या घरात पाणी येते, यावर पालिकेकडून उपाययोजना होत नाही अशी कैफियत त्यांनी मांडली होती. त्यामुळे संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राचे पाणी गोडे करून ते पिण्यायोग्य वापरल्यास नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध होईल यावर विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. आमच्यानागपूरमध्ये खड्डे पडत नाही कारण आम्ही रस्ते काँक्रीटचे बनवले आहेत. त्याप्रमाणे मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे केले पहिजे असे आपण मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुंबई महानगर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना सांगितले अशी माहिती त्यांनी दिली. तर 6000 कोटी रुपये खर्च करून मुंबईतील रस्ते काँकीटचे करणार असल्याचे चहल यांनी सांगितल्याचेही ते म्हणाले.

संस्थेनं पुढाकार घ्यावा

जन्म मृत्यूचा दाखला आणि अन्य कामांसाठी सामान्य नागरिकांना पालिकेत खेटा मारायला लागतात,नागतिक पालिकांना शिव्यांची लखोटी वाहतात. त्यामुळे डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यांना विविध सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी या संस्थेने पुढाकार घ्यावा असे आवाहन गडकरींनी केले.

टेंडरिंगप्रणालीअडचणीची

80 टक्के फायनान्स आणि 20 टक्के गुणवत्ता ही सद्याची टेंडरिंग प्रणाली ही अडचणीची आहे. नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचा उपयोग करून 80 टक्के गुणवत्ता आणि 20 टक्के फायनान्स अशी प्रणाली उपयोगात आणा, ई टेंडरिंग प्रणालीचा वापर करा. जॉईंट व्हेंचर करून स्थानिक स्वराज्य संस्थांची गुणवता सुधारा, त्यासाठी चांगले अभ्यासक्रम संस्थेत सुरू करा असे आवाहन केले.

सांडपाण्यावर प्रकिया करून ते पाणी वृक्ष लागवड व इतर कामासाठी कसे वापरता येईल याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.सॉलिड वेस्ट,लिक्विड वेस्ट यांचा उपयोग करा आणि 24 बाय 7 पाणी जनतेला उपलब्ध करा.सोलर प्रणालीचा उपयोग करून वीज खर्चात कपात करा.यामुळे महानगर पालिकां आर्थिक सक्षम होतात आणि त्यांना उत्पन्न देखिल मिळेल असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञानाचा वापर करा

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ग्रीन टेक्नॉंलॉजीचा वापर करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करा.त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी उपलब्ध करून घ्या. सांडपाण्यावर प्रकिया करून वीज निर्मिती केल्यास आणि इलेट्रिक वाहन प्रणाली आमलात आणल्यास इंधनात मोठी बचत होईल.तसेच महानगर पालिकांना उत्पन्नदेखील मिळेल असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. जगात कोणते तंत्रज्ञान उपयीगत आणले जाते त्याचा अभ्यास करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा कशा मिळतील यासाठी संस्थेने पुढाकार यावा असे आवाहन त्यांनी केले. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी कॅनडा येथील बुचर गार्डनची निर्मिती करा असेही ते म्हणाले.

1926 पासून ही संस्था कार्यरत असून देशात या संस्थेच्या 52 शाखा असून देशात आणि जगात विविध देशांशी सामंजस्य करार केला आहे. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेने प्रशिक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांना कुशल मनुष्यबळ पुरवले आहे, असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :नितीन गडकरीमुंबई