ईडीकडे आज जाणार की पुन्हा लेटरबाजी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:04 AM2021-07-05T04:04:32+5:302021-07-05T04:04:32+5:30
अनिल देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भ्रष्टाचाराबाबत दाखल गुन्ह्यात दोनदा चौकशीला हजर रहाण्याचे टाळणारे ...
अनिल देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भ्रष्टाचाराबाबत दाखल गुन्ह्यात दोनदा चौकशीला हजर रहाण्याचे टाळणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तिसऱ्या समन्सनुसार सोमवारी कार्यालयात हजर राहणार की पुन्हा वकिलामार्फत पत्र पाठवणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत असल्याने तिकडेही ते उपस्थित राहतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. देशमुख यांनी यापूर्वी दोन नोटिसांना स्वतः कार्यालयात हजर न राहता वकिलांद्वारे उत्तर दिले होते. त्यामुळे ईडीने शनिवारी त्यांना पुन्हा तिसरे समन्स बजावत सोमवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे, मात्र त्यांनी मागणी केलेली चौकशीसंबंधी कागदपत्रे देण्यास ईडीने नकार दिल्याने देशमुख हे गैरहजर राहतील, वकिलामार्फत पत्रव्यवहार करतील तसेच ईडीच्या नोटिसीला न्यायालयात आव्हान दिले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईत हप्ता वसुली आणि बदल्यांमध्ये गैरव्यवहाराबद्दल दाखल गुन्ह्यात ईडीने देशमुख यांना यापूर्वी २६ व २९ जूनला चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली आहेत, मात्र दोन्ही वेळा त्यांनी वकिलामार्फत अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करीत जाणे टाळले आहे. त्याचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पालांडे व पीए कुंदन शिंदे हे ईडीच्या कोठडीत आहेत.