मुंबई-लोकसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास सोबत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. जागावाटपाबाबत सध्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बैठका सुरू आहेत. दरम्यान, आता काही दिवसातच महाविकास आघाडीची सभा होणार आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंबईत येणार आहे. या यात्रेत आणि महाविकास आघाडीच्या सभेत सहभागी होणार का यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडून येणाऱ्या माणसांची मोळी म्हणजे राष्ट्रवादी; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
"आज होणाऱ्या बारामती येथील सभेत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची १७ मार्चला होणाऱ्या मुंबई रॅलीत आम्ही सहभागी होणार नाही, कारण जोपर्यंत आम्ही समन्वय प्रस्थापित करत नाही. त्यांच्यासोबत किंवा महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही तोपर्यंत कोणत्याही महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थित राहणार नाही, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
'तर भाजपसोबत जाण्याचा विचार करू'
भाजप जातीय आधारावर सार्वजनिक पुजारी नेमण्याचे धोरण बदलणार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राजकीय समझौता करायला तयार आहोत, असे जाहीर करत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी नवी गुगली टाकली. भाजपविरोधात वंचित मोठी टक्कर देईल असा दावाही करायला ते विसरले नाहीत.महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही मतभेद आहेत. हा जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर लोकसभेच्या सर्व ४८ जागा आम्ही लढवणार, असा इशाराही ॲड आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांना दिला. जागांवरून महाविकास आघाडीमध्येच एकमत झालेले नाहीत त्यामुळेच त्यांचीच आघाडी होईल की नाही, याबाबत शंका असल्याचे सांगत आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्षांची फिरकी घेतली. पक्षाच्या मेळाव्यासाठी इचलकरंजीत आलेल्या आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.