यंदा तरी काळजी घेणार का ?
By admin | Published: August 3, 2015 02:52 AM2015-08-03T02:52:01+5:302015-08-03T02:52:01+5:30
गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शहर-उपनगरांतील गोविंदा पथकांनी दहीहंडीचा सराव सुरू केला आहे. दहीहंडीचे धोरण अनिश्चित असले तरी न्यायालयाने
मुंबई: गुरुपौर्णिमेचा मुहूर्त साधत शहर-उपनगरांतील गोविंदा पथकांनी दहीहंडीचा सराव सुरू केला आहे. दहीहंडीचे धोरण अनिश्चित असले तरी न्यायालयाने गोविंदांच्या सुरक्षेकरिता दिलेले आदेश गोविंदा पथके पाळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. गेल्या काही वर्षांत गोविंदा पडून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने यंदा तरी सरावादरम्यान पुरेशी काळजी घेतली जाणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
दहीहंडीच्या दिवशी जास्तीत जास्त थर लावण्याचे आव्हान गोविंदा पथके स्वीकारतात, त्याचप्रमाणे सरावातही उंच थर लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्या वेळीही अनेक गोविंदा जायबंदी होण्याचे प्रकार घडतात.
गेल्यावर्षी सरावादरम्यान शहर-उपनगरांतील १२ गोविंदा जखमी झाले होते. तर करी रोड येथील राजेंद्र बैकर, सानपाडा येथील किरण तळेकर या बालगोविंदांचा सरावादरम्यान मृत्यू झाला होता. जोगेश्वरी येथील हृषिकेश पाटील हा १८ वर्षीय तरुण सराव सुरू असतानाच कोसळला आणि हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला होता.
न्यायालयाने सुरक्षाविषयक दिलेल्या आदेशांमध्ये गोविंदा जखमी झाल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था असावी. तसेच शासनाच्या रुग्णवाहिकांचा यासाठी वापर करावा़ थर ज्या ठिकाणी रचले जातात त्या ठिकाणी गाद्या असाव्यात. गोविंदांना सेफ्टी बेल्ट्स आणि हेल्मेट द्यावे, शिवाय प्रथमोपचाराची पेटी असणे अत्यावश्यक असल्याचे
म्हटले होते. त्यामुळे सराव असो वा उत्सव गोविंदा पथकांनी
गोविंदाच्या जीवाशी खेळ न करता आता तरी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)