मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवावेत अशी मागणी करत मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला. त्यानंतर राज्यभरात भोंग्यावरून राजकारण पेटलं. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनाही असेच पत्र मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आता राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकरांनी(MNS Bala Nandgonkar) काल संध्याकाळी ६ वाजता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले. ते पत्र वाचून पांडे यांनी सहपोलीस आयुक्त सुहास वरके यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नांदगावकरांनी आज मंत्रालयात दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. गृहमंत्र्यांनी आयुक्तांशी चर्चा करून या पत्राबाबत काय कार्यवाही करायची यावर चर्चा झाली. या पत्राबाबत गुन्हे शाखा तपास करतच आहे परंतु राज ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा विचार सुरू झाला आहे.
२०२० पर्यंत राज ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा होती. परंतु ठाकरे सरकारनं या सुरक्षेत कमी करून वाय प्लस दिली होती. मात्र आता राज ठाकरेंना मिळणाऱ्या धमक्या पाहता वरिष्ठ पोलीस पातळीवर सुरक्षा वाढवण्याच्या हालचाली सुरू आहे. बाळा नांदगावकर हे माजी गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सध्या कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी आहे. परंतु धमकीच्या पत्रामुळे नांदगावकर यांच्याही सुरक्षेत वाढ करण्याचा विचार सुरू आहे.
राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर...
गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणाले की, "माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचं पत्र प्राप्त झालं आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवलं व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिलं आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचं आश्वासन मला दिलं आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारनं लक्षात ठेवावं", असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.