मुंबई पोलीस दलात बदल्यांचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:07 AM2021-07-07T04:07:49+5:302021-07-07T04:07:49+5:30
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण मुंबईतील आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांनीच घडवून ...
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरण आणि ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण मुंबईतील आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांनीच घडवून आणल्याने पोलीस दलाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणात मलिन झाली. या पोलीस कर्मचाऱ्यांची खात्यातून हकालपट्टी करण्याची नामुष्की ओढावली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. अशात चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळविण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वादग्रस्त चकमकफेम अधिकारी सचिन वाझे याला पोलीस खात्यात परत घेण्यापासून ते त्याच्याकडे गुन्हे शाखेतील महत्त्वाचे असा सीआययू विभाग देऊन मोठ्या गुन्ह्यांचा तपास देण्यापर्यंत घडलेल्या सर्वच गोष्टी संशयाच्या फेऱ्यात अडकल्या होत्या. यामुळेच गृह विभागाने पहिल्यांदा तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून हटविले. हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई पोलीस दल आणि त्यात गुन्हे शाखेवर पडलेला बदनामीचा डाग धुऊन काढण्यासाठी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या.
पोलीस अधिकाऱ्यांच्या या घाऊक बदल्यामुळे मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. गुन्हे शाखेपाठोपाठ आर्थिक गुन्हे शाखेत ५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या १३ अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे सुरूच राहिले. एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईबाहेर साइड पोस्टिंगवर फेकण्यात आले. पुढे मुंबईत जास्त काळ कार्यरत असलेल्या ७२७ अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदलीसाठी यादी तयार करण्यात आली आहे.
महत्त्वाची पदे रिक्त होणार
मुंबईतून या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने मुंबई पोलीस दलातील महत्त्वाची पदे रिक्त होणार आहेत. त्यामुळेच मुंबई पोलीस दलातील आणि मुंबई बाहेरून येणारे अधिकारी आपल्याला चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी म्हणून धडपड करताना दिसत आहे.
जवळच्या पोलीस ठाण्यासाठी धडपड
अशात बरेच अधिकारी जवळचे पोलीस ठाणे मिळावी म्हणून धडपड करताना दिसत आहेत. तर सध्या निवृत्तीच्या वाटेवर पोलीस अधिकारी शक्यतो साइड पोस्टिंग घेण्यावर भर देताना दिसून येत आहेत.