Join us

खासगीकरणाचे वारे अराजकतेच्या दिशेने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात सध्या खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत आणि दुर्दैवाने त्यांची दिशा अराजकतेकडे झुकत चालली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात सध्या खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत आणि दुर्दैवाने त्यांची दिशा अराजकतेकडे झुकत चालली आहे. दुसरीकडे रोजगार वाढविण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु, उद्योग जगला तरच कामगार जगेल, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे स्पष्ट मत खासदार अरविंद सावंत यांनी काढले.

दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या वतीने गुरुवारी ''कामगार शिक्षण दिना''निमित्त आभासी माध्यमातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सावंत म्हणाले, कोरोना संकटामुळे अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद झाले आहे. बेरोजगारांच्या नोंदी होत नाहीत, अंदाजे आकडेवारी दिली जाते. जसे कामगारांना प्रशिक्षण दिले जाते तसे उद्योजकांनादेखील दिले पाहिजे. मालक हा आपला शत्रू नाही, आपला हक्क मागताना कर्तव्य विसरू नका. स्पर्धेच्या युगात कामगार कसा जगेल याचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी प्रादेशिक संचालक चंद्रसेन जगताप, डॉ. शिवपुत्र कुंभार, डॉ. सी. बी. गंभीर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ''श्रम संहिता'' या ई-पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कामगार शिक्षण चळवळ योगदान दिलेल्या चंद्रकांत खोत, अनिल मोरे, ॲड. मनीषा बनसोडे, आसिया रिझवी यांचा सत्कार करण्यात आला.