वारे मुंबईभोवती चक्रीवादळासारखे फिरत होते
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:22 AM2020-08-07T05:22:14+5:302020-08-07T05:22:50+5:30
मुंबई आणि आसपासच्या परिसरात ताशी १०६ किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता.
मुंबई : उत्तर कोकण आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबईसह आसपासच्या परिसरावर गोल फिरलेल्या वाऱ्याचा वेग ताशी १०६ किमी एवढा झाला; आणि मोठ्या प्रमाणावर वाहिलेल्या वाऱ्यांनी मुंबईकरांना धडकी भरविली. महत्त्वाचे म्हणजे हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा देत वाºयाचा वेग ताशी १०६ किमी पोहोचेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसारच एकत्रित दाखल झालेल्या पाऊस-वाºयाने मुंबई, ठाणे, नवी मुंबईची दमछाक झाली.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात ताशी १०६ किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. त्यानुसार वाºयाच्या वेगाची नोंद ताशी १०६ किमी एवढी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर या प्रणाली नेमक्या कशा तयार झाल्या, त्याचा मुंबईसह लगत जोर कसा वाढला याची माहिती हवामान खात्यातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यांनी सांगितले की, हवामानात दोन प्रकाराच्या प्रणाली निर्माण होत असतात. पहिली म्हणजे लो प्रेशर. यास आपण कमी दाबाचे क्षेत्र असे म्हणतो. कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्यासाठी समुद्रावरील तापमान अधिक असावे लागते. हवामान योग्य असेल तर कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होते. चक्रीवादळ एका दिवसांत तयार होत नाही. त्याला अनेक दिवस लागतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर वाहणारे वारे हे चक्रीवादळाचे वारे नाहीत.
दुसरी प्रणाली म्हणजे सायक्लॉनिक सर्क्युलेशन होय. या प्रणालीत सर्व वारे एकत्र येऊन गोलाकार फिरतात. वाºयाचा वेग प्रचंड वाढतो. नेमके गेल्या २४ तासांत आणि आता उत्तर कोकण आणि अरबी समुद्रावर सायक्लॉनिक सर्क्युलेशन होते आणि आहे. एकाच वेळी निर्माण झालेल्या सायक्लॉनिक सर्क्युलेशनमुळे गोलाकार फिरणारे वारे मुंबईसह लगतच्या परिसरात वेगाने फिरू लागले. याचाच परिणाम म्हणून वाºयाचा वेग ताशी ६०पासून १०० किमीपर्यंत पोहोचला.
पावसाचा जोर किंचित कमी होणार
उत्तर कोकणावरील सायक्लॉनिक सर्क्युलेशनमध्ये जे वारे आहेत ते उत्तर पूर्व दिशेने वाहत आहेत. तर, अरबी समुद्रावरील सायक्लॉनिक सर्क्युलेशनमध्ये जे वारे आहेत ते दक्षिण पश्चिम दिशेने वाहत आहेत. म्हणजे दोन्ही प्रणालीत वाºयाच्या दिशा विरुद्ध आहेत. या प्रणाली मुंबईसह अरबी समुद्रावर आहेत. परिणामी वारे वेगाने वाहत आहेत आणि मुंबईभोवती ते गोल फिरत असून, येत्या २४ तासांसाठी वाºयाचा वेग कायम राहणार आहे़