लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपोरजॉय चक्रीवादळ १५ जून रोजी सायंकाळी कराची ते गुजरात दरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून, याच दरम्यान पुढील ४८ तासांत म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात वेगवान वारे वाहतील आणि किरकोळ पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मान्सून कुठे पोहोचला?
- महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर अजूनही तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे.
- हवामानात अनुकूल बदल होत असला तरीदेखील मान्सून पुढे सरकलेला नाही.
- पुढील दोन दिवसांत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता असून, तो १८ जूनच्या आसपास मुंबईत दाखल होईल.
चक्रीवादळ जसजसे पुढे सरकत आहे, तसतसे मुंबईतल्या हवामानात बदल होत आहे. बुधवारी आणि गुरुवारी चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वेगाने वारे वाहतील. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ४५ किलोमीटर असेल आणि किरकोळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग
चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी गुजरातला धडकणार असून, नंदुरबारपासून मुंबईपर्यंतच्या खालच्या पट्ट्यात त्याचा परिणाम पाहण्यास मिळेल. मुंबईवर प्रभाव कमी असला तरी नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात वेगाने वारे वाहतील. किरकोळ पावसाची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी