मुंबई : राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने दणक्यात घेतला असला तरी आता वाईन विक्रीच्या परवानगीसाठी प्रसिद्ध झालेल्या हरकती व सूचनांची जाहिरात मात्र अदखलपात्र पद्धतीने कोपऱ्यात प्रसिद्ध केली आहे. नागरिकांकडून फारशा हरकती व सूचना येऊ नयेत आणि सुलभतेने परवानगी देण्याची प्रक्रिया पार पडावी म्हणून सरकारने अत्यंत किरकोळ स्वरुपात ही जाहिरात प्रसिद्ध केली, अशा प्रकारचे अनेक मेसेज ‘लोकमत’ला आले आहेत. शिवाय व्हॉटस्ॲपवरदेखील या विषयाची जोरात चर्चा सुरू आहे.
सुपर मार्केटमधून वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने २७ जानेवारीला घेतला. त्यानंतर, ३१ मार्चला राज्य सरकारने या विक्रीस परवानगी देण्यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध करत यासंदर्भात नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. साधारणपणे, जेव्हा राज्य सरकार कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागवते, त्यावेळी अतिशय ठळकपणे याची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. मात्र, वाईन विक्रीसंदर्भात हरकतींची जाहिरात प्रसिद्ध करताना सरकारने अत्यंत नगण्य आणि एखाद्या कोपऱ्यात लहानशी जाहिरात दिल्याचे दिसून येते. कुणाच्या लक्षातही येणार नाही आणि जाहिरात दिल्याची औपचारिकताही पार पडेल, अशा पद्धतीने प्रसिद्ध करण्यामागे सरकारचा काय हेतू आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
माहिती व जनसंपर्क विभागाकडे आम्ही जाहिरात पाठवली होती. जाहिरात लहान किंवा कोपऱ्यात प्रसिद्ध करा, असे कोणतेही निर्देश आम्ही दिलेले नाहीत. एखाद्या ठिकाणी जर तशी प्रसिद्ध झाली असेल तर आम्हाला दोष देता येणार नाही. वास्तविक सूचना व हरकतींचा कालावधी हा ३० दिवसांचा असतो; पण याप्रकरणी आम्ही ९० दिवसांची मुदत दिली आहे.- कांतीलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क