Join us

वादग्रस्त संस्थेचे पंख पालिकेने छाटले

By admin | Published: April 11, 2015 1:47 AM

खेळाच्या मैदानावर पार्किंग, परस्पर फॅशन शो आयोजित करण्याचे वादग्रस्त निर्णय भायखळा येथील डॉ़ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या खासगी व्यवस्थापनाला

मुंबई : खेळाच्या मैदानावर पार्किंग, परस्पर फॅशन शो आयोजित करण्याचे वादग्रस्त निर्णय भायखळा येथील डॉ़ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या खासगी व्यवस्थापनाला चांगलेच महागात पडले आहे़ १३ वर्षांचा हा करार महासभेत एकमताने रद्द ठरवीत या वस्तुसंग्रहालयाची देखभाल करणाऱ्या खासगी संस्थेचा मनमानी कारभार महापालिकेने आज संपुष्टात आणला़भायखळा येथील राणीबागेच्या परिसरातच असलेल्या या वस्तुसंग्रहालयाची देखभाल बजाज फाउंडेशन आणि इनटॅकमार्फत केली जाते़ या वस्तुसंग्रहालयाच्या विश्वस्त मंडळावर महापौर अध्यक्षस्थानी आहेत़ तरीही वार्षिक ताळेबंद अथवा येथील कार्यक्रमाबाबत पालिकेची परवानगी घेतली जात नाही़ गेल्या महिन्यात पालिकेला अंधारात ठेवून येथे फॅॅशन शो आयोजित करण्यात आला होता़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर करारच रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली़ त्यानुसार मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बजाज फाउंडेशनबरोबर असलेला करार रद्द करण्याचा ठराव पालिकेच्या महासभेत आज मांडला़ सर्वपक्षीय सदस्यांच्या सहमतीने हा ठराव एकमताने मंजूर झाला़ नवीन विश्वस्त मंडळाबाबत निर्णय होईपर्यंत पुढील सहा महिने या संस्थेमार्फतच वस्तुसंग्रहालयाची देखभाल होणार आहे़ परंतु सर्व अधिकार यापुढे पालिका स्वत:कडे राखून ठेवणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)