मुंबई : देशात सध्या विमान उद्योगात मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून या अनुषंगाने विमान यंत्रणा सुनियोजित स्थितीत चालविण्यासाठी अन्य विभागांत देखील मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली असून लवकरच १२१२ पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रामुख्याने नागरी विमान महासंचालनालय (डीजीसीए), एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटी व एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आदी विभागांत केली जाणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ज्या प्रमाणात विमान कंपन्यांतर्फे नव्या विमानांची खरेदी तसेच नव्या मार्गांवर विस्तार केला जात आहे, त्याकरिता विमान प्रवासासाठी पायाभूत सुविधा देणाऱ्या यंत्रणेत देखील मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. याची सुरुवात डीजीसीएकडून करण्यात आली आहे.
या विभागात ४१६ नव्या जागांची भरती होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने हवाई वाहतूक नियंत्रक, विमानाचे इंजिनिअर, वैमानिक अशा महत्त्वाच्या पदांची भरती करण्यात येणार आहे. तर, देशातील विमानतळांचे व्यवस्थापन व देखभाल करणाऱ्या भारतीय विमान प्राधिकरणात देखील ७९६ नव्या पदांची भरती करण्यात येणार आहे.
यापैकी ३४० पदांची भरती मे २०२२ मध्ये करण्यात आली आहे. या खेरीज, विमान उद्योगातील आर्थिक शिस्तीचे नियमन करणाऱ्या एअरपोर्ट इकोनॉमिक रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये देखील १० जागा भरण्यात येणार आहेत.