राज्यातील पालिकांमध्ये आता स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:23 AM2017-12-29T05:23:10+5:302017-12-29T05:23:14+5:30
मुंबई : राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान केले जाईल आणि विजेत्यांना भरघोस बक्षिसेही दिली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.
मुंबई : राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे आयोजन १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान केले जाईल आणि विजेत्यांना भरघोस बक्षिसेही दिली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणा-या शहरांच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ची आढावा बैठक मंत्रालयात फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची घोषणा करतानाच अमृत शहरे व अमृत योजनेत सहभागी नसलेल्या शहरांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा केली. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह ठाणे, पनवेल, भिवंडी, उल्हासनगरचे महापौर, विविध नगरपालिकांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिका-यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या शहरांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन गुणानुक्रमात आलेल्या राज्यातील शहरांना २० कोटी तर, ४ ते १० क्रमांकांमध्ये आलेल्या शहरांना १५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागीय गुणानुक्रमात येणाºयांसाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या तीन शहरांना १५ कोटी, ४ ते १० क्रमांकांसाठी १० कोटी तर ११ ते ५० क्रमांकांमधील शहरांना प्रत्येकी ५ कोटी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर - म्हैसकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता आदी उपस्थित होते.
>मार्चमध्ये होणार स्पर्धेचे परीक्षण
स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचे परीक्षण मार्चमध्ये केले जाईल. अ आणि ब वर्ग महापालिकांतील सर्वांत स्वच्छ तीन वॉर्डांना अनुक्रमे ५०, ३० व २० लाखांचे बक्षीस दिले जाईल. ड वर्ग महापालिकांतील वॉर्डांसाठी ही रक्कम ३०, २० आणि १५ लाख असेल. तसेच अ वर्ग नगर परिषदांसाठी अनुक्रमे ३०, २० व १५ लाख तर ब वर्ग नगर परिषदांसाठी २०, १५, १० लाख आणि क वर्ग नगर परिषदांसाठी अनुक्रमे १५, १० व ५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.