जागतिक कौशल्य स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्या युवांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर रोख पुरस्कार देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:09 AM2021-09-06T04:09:13+5:302021-09-06T04:09:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या युवक-युवतींना ऑलिम्पिक स्पर्धांच्या धर्तीवर ...

The winners of the World Skills Championships will be awarded cash prizes on the lines of the Olympics | जागतिक कौशल्य स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्या युवांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर रोख पुरस्कार देणार

जागतिक कौशल्य स्पर्धेत पुरस्कार मिळविणाऱ्या युवांना ऑलिम्पिकच्या धर्तीवर रोख पुरस्कार देणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या युवक-युवतींना ऑलिम्पिक स्पर्धांच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. या वेळी मंत्री मलिक यांनी घोषणा केली. राज्य स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील २६३ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील १३२ युवक-युवतींना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाद्वारे मंत्री मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुवर्णपदक विजेत्यासाठी दहा हजार रुपये, रजत पदक विजेत्यासाठी सात हजार रुपये तर कांस्य पदक विजेत्यासाठी पाच हजार रुपये पुरस्कार रक्कमही देण्यात आली. आता गांधीनगर येथे होणाऱ्या झोनल स्पर्धेत आणि त्यानंतर बंगळुरू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी या युवक-युवतींना मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील.

राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांची संपूर्ण तयारी कौशल्य विकास विभागामार्फत करून घेण्यात येईल. त्यांना जागतिक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे मंत्री मलिक म्हणाले. महाराष्ट्रातील युवक-युवतीमध्ये चांगले टॅलेंट आहे. कौशल्यातील टॅलेंट शोधण्यासाठी आयटीआयबरोबरच विविध उद्योग, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी शोध घेऊन टॅलेंटेड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी थ्रीडी डिजिटल गेम आर्ट, ऑटो बॉडी रिपेअर, ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, कारपेंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सीएनसी मिलिंग, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन टेक्नॉलॉजी, हेअर ड्रेसिंग, हाॅटेल रिसेप्शन, हेल्थ अँड सोशल केअर अशा विविध क्षेत्रांतील कल्पक अशा कौशल्यांचे सादरीकरण केले.

परळ येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रेनरशिप येथे झालेल्या या कार्यक्रमास संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रुस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष बोमन रुस्तम इराणी, डॉ. इंदू सहानी, वर्ल्ड स्किलचे कंट्री हेड प्रकाश शर्मा, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह उपस्थित होते. बांधकाम क्षेत्रातील कौशल्यात चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची जबाबदारी तथा स्पॉन्सरशिप आपण स्वीकारीत आहोत, असे बोमन रुस्तम इराणी यांनी या वेळी जाहीर केले.

Web Title: The winners of the World Skills Championships will be awarded cash prizes on the lines of the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.