मुंबई : विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा जिंकून भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीने शुक्रवारी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार शेकापचे जयंत पाटील (शरद पवार गट समर्थित) यांचा पराभव झाला. भाजपचे ५, शिंदेसेनेचे २, अजित पवार गटाचे २ असे महायुतीचे नऊ उमेदवार जिंकले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले.
पंकजा मुंडे यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला होता, अलिकडच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला पण आजच्या विजयाने त्या विधान परिषदेवर पोहोचल्या. उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. नार्वेकर यांनी पहिल्या पसंतीची २२ मते अधिक दुसऱ्या पसंतीच्या मतांसह विजय साकारला.
अजित पवारांचा काकांना धक्का, शिंदेंची मते फुटली नाहीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेत काका शरद पवार यांच्याकडून मात खाल्ली होती. आज त्यांनी काकांवर मात केली. आपले एकही मत फुटू न देता काँग्रेस आणि शरद पवार गटातील काही मते खेचून आणली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची ४९ मते मिळाली. त्यांचे एकही मत फुटले नाही.
काँग्रेसची किती मते फुटली?
काँग्रेसकडे ३७ मते होती. पक्षाच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली. म्हणजे पहिल्या पसंतीची १२ मते काँग्रेसकडे जादा होती. उद्धवसेनेकडे स्वत:ची १४ आणि एक अशी १५ मते होती. त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली. काँग्रेसने पहिल्या पसंतीचे एकही मत शेकापचे जयंत पाटील यांना दिले नाही. नार्वेकर यांना काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मते मिळाली असे गृहित धरले तरी काँग्रेसची ५ मते फुटली. नार्वेकर यांनी अपक्ष आणि लहान पक्षांची किमान दोन मते खेचली होती असे म्हटले जाते. ते गृहित धरले तर काँग्रेसची ७ मते फुटली असा तर्क मांडला जात आहे.
शरद पवार गटही फुटला?
शेकापचे नेते जयंत पाटील हे पराभूत झाले. शरद पवार यांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. शरद पवार यांच्यासोबत १२ आमदार आहेत. पाटील यांना १२ मते मिळाली. शेकापचे एक आमदार, लहान पक्ष व अपक्षांची किमान सहा मते त्यांनी जुळविलेली होती असे ते स्वत:च सांगत होते. त्यामुळे शरद पवार गटाची मतेही फुटल्याची जोरदार चर्चा होती.
फडणवीसांनी विरोधकांना दिला दणका
२०२२ मधील विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याही निवडणुकीत महाविकास आघाडीला दणका देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मतदानाचा पॅटर्न कसा असावा हे त्यांनी निश्चित केले. भाजपच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २६ मते आणि सदाभाऊ खोत यांना केवळ १४ मते असे चित्र होते तेव्हा सदाभाऊ म्हणाले, मी गेलो वाटते. फडणवीस त्यांना म्हणाले, तुम्ही जिंकलेले आहात, चिंता करू नका, आणि तसेच झाले.
भाजप- देवेंद्र फडणवीस यांच्या अचूक नियोजनाच्या बळावर भाजपने सर्व उमेदवार निवडून आणले.
शिंदेसेना- शिंदेसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी पहिल्या पसंतीची मते घेत अगदी सहजपणे निवडणूक जिंकली.
अजित पवार गट- शरद पवार गटाच्या ४ आमदारांची मते महायुती उमेदवारांना मिळाली असल्याचे बोलले जात आहे.
उद्धवसेना- पहिल्या पसंतीची २२ मते घेणारे नार्वेकर यांनी काही मते महायुती वा इतर पक्षांकडून घेतली.
काॅंग्रेस- एक उमेदवार जिंकला असला तरी काँग्रेसची सर्वाधिक सात मते फुटल्याची शंका आहे.