लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिवाळ्यादरम्यान प्रदूषण पातळी वाढत असल्यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता आहे. शिवाय डॉक्टरांनी तपमान व कोरोनाचा थेट संबंध नसल्याचे सांगितले आहे. मात्र हिवाळ्यात लोकांचे हात धुण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर कपडे सातत्याने बदलविण्याचे टाळले जाते. यामुळे संसर्गात वाढ होऊ शकते, असे स्पष्ट केले. परिणामी, मुंबई महापालिका क्षेत्रात १७ हजार ४६७ खाटा या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार इतकी आहे. चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीदेखील चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्यात येतो आहे. मोठ्या संख्येने फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले. या माध्यमातून अनेक डॉक्टरांनी सेवा दिल्या. सील झोनबाबत ड्रोन व सीसीटीव्हीसारख्या बाबींच्या साहाय्याने लोकांना केवळ सूचित केले नाही, तर या अनुषंगाने आवश्यक त्या बाबींची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची खात्री वेळोवेळी करण्यात आली.
* अशी घेण्यात येते काळजी
१. ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे आढळून आली त्यांना तातडीने विलगीकरण कक्षांमध्ये स्थानांतरित करण्यात येत आहे.
२. सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने व नियमितपणे सॅनिटायजेशन करण्यात येत आहे.
३. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मुखावरण अर्थात फेस मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
४. जे नागरिक फेस मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी आढळून येतील, त्यांना दंड आकारणी करण्यात येत आहे.