सूर्याजीचा पारा उतरला... मुंबईत थंडीचे आगमन! सरासरी किमान तापमान २० अंश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 06:11 AM2022-11-08T06:11:45+5:302022-11-08T06:12:02+5:30
मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानात घसरण होत असून, बहुतांश शहरांचे किमान तापमान आता १५ अंशांवर खाली घसरले आहे.
मुंबई :
मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानात घसरण होत असून, बहुतांश शहरांचे किमान तापमान आता १५ अंशांवर खाली घसरले आहे. किमान तापमानात घसरण होत असली तरी हुडहुडी भरविणाऱ्या थंडीसाठी महिनाअखेर उजाडणार आहे. दुसरीकडे मुंबईकरांना दिवसा उन्हाचे चटके बसून, रात्रीच्या हवेत हलका गारवा जाणवत आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या दुहेरी हवामानाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. मुंबईचे किमान तापमान २० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदविले जात आहे.
ऑक्टोबर हिट नोव्हेंबरात?
ऑक्टोबरमध्ये राज्यभरात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा बसला नव्हता. मुंबईतही तुलनेने ऑक्टोबर हिट जाणवली नव्हती.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईचे कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदविले गेले. सलग दोन दिवस कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या आसपास राहिला आहे.
त्यामुळे ऑक्टोबर हिटचा बॅकलॉग नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला भरून निघत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील किमान तापमानाचा आकडा आता खाली घसरत आहे. पुणे आणि नाशिकमध्ये पारा अनुक्रमे १५ आणि १२ पर्यंत घसरला आहे.
राज्यातील शहरांचे किमान तापमान
उस्मानाबाद १७.६
मुंबई २०.६
बारामती १४.१
सांगली १७.१
माथेरान २०.६
अहमदनगर १४.१
जालना १५
सातारा १५.५
ठाणे २३.२
पुणे १३.२
परभणी १५.४
महाबळेश्वर १५.६
जळगाव १४.५
औरंगाबाद १३.९
नाशिक १२.८
नांदेड १७.८
रत्नागिरी २१
कोल्हापूर १८.९
सोलापूर १६.५