मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर ओसरल्यानंतर आता कुठे मुंबईवर आलेले पावसाचे काळेकुटट ढग आता विरले आहेत. परिणामी मागील पाचएक दिवसांपासून मुंबईत सुरु असलेला हिवाळ्यातला पावसाळा थांबला आहे. मंगळवारी मुंबईत बहुतांश ठिकाणी स्वच्छ मोकळे आकाश होते. शिवाय मळभ हटल्याने दाखल झालेल्या सुर्य प्रकाशामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. दरम्यान, हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात मोठया प्रमाणावर चढ उतार आले होते. विशेषत: कमाल तापमान थेट २७ अंशावर घसरले होते. तर दुसरीकडे किमान तापमान स्थिर होते. कमाल तापमानातील घसरणीमुळे मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला होता.
मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने पाच दिवस हवामानात उल्लेखनीय बदल झाले. सुरुवातीचे तीन दिवस हवामान ढगाळ राहिल्यानंतर रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे मुंबई शहरासह उपनगरात बहुतांश ठिकाणी पावसाहे हजेरी लावली. रविवारी रात्री दिडच्या सुमारास दक्षिण मुंबईसह मुंबईच्या उपनगरात पावसाच्या मोठया सरी कोसळल्या. सोमवारी सकाळी उपनगरात बहुतांश ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली. दुपारपर्यंत असलेले मळभ नंतर मात्र हटले. मंगळवारी मात्र संपुर्ण मुंबईतून पावसाने माघार घेतली. शिवाय मोकळे आकाश आणि स्वच्छ सुर्यप्रकाशामुळे मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला. दरम्यान, मुंबईवरील मळभ हटले असले आणि पाऊस थांबला असला तरी मंगळवारी मुंबईत ठिकठिकाणी धूर, धूळ, धुळीकण मोठया प्रमाणात वातावरणात आढळून आले. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात मोठया प्रमाणावर दृश्यमानता कमी झाल्याचे चित्र होते. संपुर्ण मुंबईतही कमी अधिक फरकाने हीच स्थिती होती.