लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटींची तरतूद; पहिल्याच अधिवेशनात ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 05:47 IST2024-12-17T05:47:07+5:302024-12-17T05:47:32+5:30

महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, पुरवणी मागण्यांत तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल. 

winter session maharashtra 2024 provision of 1400 crore for ladki bahin yojana and supplementary demands of 35 thousand crores in the very first session | लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटींची तरतूद; पहिल्याच अधिवेशनात ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

लाडक्या बहिणींसाठी १४०० कोटींची तरतूद; पहिल्याच अधिवेशनात ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महायुती सरकारने सोमवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ३५,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात मांडण्यात आलेल्या या पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या चालू असलेल्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. 

शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत या पुरवणी मागण्या मांडल्या. ‘लाडकी बहीण’साठी १४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

डिंसेंबरचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता

महिला व बाल विकास विभागासाठी २,१५५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, यात लाडकी बहीण योजनेसाठी १,४०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. लाडकी बहीण योजनेत २.३४ कोटी महिला लाभार्थ्यांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीपर्यंत ७,५०० रुपये आधीच देण्यात आले आहेत. 

महायुतीने ही मदत मासिक १५०० रुपयांवरून मासिक मदत २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, पुरवणी मागण्यांत तरतूद केलेली ही रक्कम डिसेंबरचे पैसे देण्यासाठी वापरली जाईल. 

दूध अनुदान योजनेसाठी ७५८ कोटी : पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजनेसाठी १२५० कोटी रुपये, पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी देण्यासाठी १२०४ कोटी रुपये, राज्यातील महाविद्यालये, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी १ हजार कोटी रुपये आणि दूध अनुदान योजनेसाठी ७५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


 

Web Title: winter session maharashtra 2024 provision of 1400 crore for ladki bahin yojana and supplementary demands of 35 thousand crores in the very first session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.