Join us  

माजी मंत्री रामदास कदमांना विधानभवनात जाण्यापासून रोखले, पोलिसांनी गेटवरच अडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 1:33 PM

रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले. मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत असा आरोप त्यांनी केला होता.

मुंबई – शिवसेना नेते रामदास कदम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे रामदास कदम यांनी शिवसेनेत खळबळ उडवून दिली होती. त्यातच आता विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी रामदास कदम विधानभवनात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले. त्यामुळे कदम यांना विधिमंडळाच्या गेटवर ताटकळत उभं राहावं लागलं. त्यानंतर काही वेळाने त्यांना प्रवेश देण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. केवळ आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्यात येत आहे. त्याचसोबत गर्दी होऊ नये म्हणून स्वीय सहाय्यकांना विधिमंडळाबाहेर उभारण्यात आलेल्या शेडमध्ये बसण्याची व्यवस्था केली आहे. रामदास कदम यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली नाही त्या कारणाने पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवले. त्यानंतर रामदास कदम फोनवर बोलत होते. परंतु त्यांना गेटवरच ताटकळत ठेवण्यात आले त्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी रामदास कदमांची अँन्टिजेन चाचणी करत त्यांचा विधानभवनात प्रवेश झाला. 

 

रामदास कदम यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले. मंत्री अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत असा आरोप त्यांनी केला होता. या राजकीय वादाची पार्श्वभूमी असल्याने रामदास कदम यांना विधिमंडळाच्या गेटवरच अडवले का? अशी चर्चा सुरु झाली. परंतु RTPCR चाचणीशिवाय कुणालाही विधान भवनात प्रवेश घेता येत नाही. कोरोनामुळे सदस्यांच्या सुरक्षेसाठी ही काळजी घेत बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येतो. तोच नियम माजी मंत्री रामदास कदम यांच्यासाठी वापरण्यात आला आहे.

काय म्हणाले होते रामदास कदम?

१९७० सालापासून भगव्या झेंड्याचा शिपाई म्हणून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून ५२-५३ वर्ष शिवसेनेचे निष्ठेने काम करत आहे. कोकणातील काही राजकीय पुढाऱ्यांना माझी अडचण होत असल्यामुळे काही बिनबुडाच्या बातम्या छापून आणल्या जातात. आम्हा जुन्या नेत्यांना मंत्री पद दिले नाही त्याचे कुठे ही दु:खं नाही. पक्षाने मला पुष्कळ काही दिले आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माझ्या मुलाला तिकिट देऊ नका व राष्ट्रवादीच्या आमदाराला जो मातोश्रीवर घेऊन आला होता व त्याला तिकिट द्या असे सांगणारा तुमचा विश्वासू म्हणून महाराष्ट्र ओळखतो व ज्याला मंत्री केले आहात तोच पुढारी त्याच राष्ट्रवादीच्या पुढाऱ्याला हाताशी पकडून मला कोकणातून संपवण्याचं राजकारण करत आहे का? असा प्रश्न कदमांनी उपस्थित करत अप्रत्यक्षपणे अनिल परब यांच्यावर निशाणा साधला होता.

टॅग्स :रामदास कदमशिवसेनाविधानसभा हिवाळी अधिवेशन