मुंबई : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष बदलून जानेवारी ते डिसेंबर असे केल्यास हिवाळी अधिवेशनातच अर्थसंकल्प मांडावा लागेल. त्यामुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.सूत्रांनी सांगितले की, विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनात यापुढचे हिवाळी अधिवेशन (डिसेंबर २०१८) मुंबईत घेण्याबाबतचा प्रस्ताव स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. केंद्र सरकार आर्थिक वर्षात करणार असलेले बदल लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशन मुंबईत घ्यावे आणि तेच अर्थसंकल्पीय असावे, अशी भूमिका मांडली.संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे पत्रकारांना सांगितले की, डिसेंबरमध्ये अर्थसंकल्प मांडल्यास जानेवारीपासून योजनांसाठी पैसे उपलब्ध होतील आणि योजनांवर योग्य वेळेत निधी खर्च करणे सुलभ होईल. आता मार्चमध्ये अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर योजना तयार करणे आणि पैसे उपलब्ध करण्यात एक-दोन महिने जातात. तसेच अनेक विभागांचा मागील वर्षाचा खर्चही पूर्ण झालेला नसतो. योजना मार्गी लागेपर्यंत पावसाळा येतो त्यामुळे योजना राबवता येत नाहीत. पावसाळ्यानंतर योजना राबवताना अनेक अडचणी येतात. यातून मार्ग काढेपर्यंत जानेवारी-फेब्रुवारी उजाडतो आणि नव्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाल्याने कामे पुढे सरकत नाहीत. कामे न झाल्याने जनता राज्यकर्त्यांना प्रश्न विचारू लागते. हे सर्व टाळण्यासाठी डिसेंबरमध्ये अर्थसंकल्प मांडल्यास जानेवारी ते जुलैपर्यंतचा वेळ आणि त्यानंतर सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंतचा संपूर्ण वेळ योजना पूर्ण करण्यास मिळेल, असेही बापट म्हणाले.>नागपूर अधिवेशन किमान तीन आठवड्यांचेमुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाप्रमाणे झाल्यास मुंबईतील अर्थसंकल्पीय/हिवाळी अधिवेशन हे पाच आठवड्यांचे असेल. नागपूरचे अधिवेशन कमीतकमी तीन आठवड्यांचे असावे आणि त्याचे पिकनिक स्वरूप बंद व्हावे यासाठीही डिसेंबरऐवजी जुलैमध्ये नागपुरात अधिवेशन घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे.
मुंबईतच होणार हिवाळी, अर्थसंकल्पीय अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 5:12 AM