नगरसेवक निधीची १८ टक्के तरतूद वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:07 AM2018-05-14T04:07:44+5:302018-05-14T04:07:44+5:30
विकासकामांसाठी मिळालेला नगरसेवक निधी खर्च करण्यास पहिल्या वहिल्या नगरसेवकांना अपयश आले आहे. संगणकीय प्रणालीतील बिघाड
मुंबई : विकासकामांसाठी मिळालेला नगरसेवक निधी खर्च करण्यास पहिल्या वहिल्या नगरसेवकांना अपयश आले आहे. संगणकीय प्रणालीतील बिघाड, वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी काळात कामे रखडल्याने ६० लाखांच्या निधीपैकी बऱ्याच जणांची तरतूद वाया गेली.
पहिल्याच वर्षी नवीन नगरसेवक निधी काही तांत्रिक कारणांमुळे खर्च न झाल्याने हा निधी वापरण्यास मुदतवाढ दिली जावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली होती. याला सर्वपक्षीय गटनेते आणि नगसेवकांनी पाठिंबा दिला होता; परंतु संगणकीय सॅप प्रणालीतील बिघाड हा काही कालावधीसाठीच होता. त्यामुळे हा निधी वाढवून देण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले. सन २०१२मध्ये महापालिकेत पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेवकांना पहिल्या वर्षी जूनपर्यंत नगरसेवकनिधी वापरण्यास परवानगी दिली होती; परंतु त्या वेळी अन्य विकासनिधी वापरण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे यापूर्वी दिलेल्या परवानगीच्या धर्तीवर नगरसेवकनिधी वापरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती; परंतु सत्ताधारी पक्षाने हा मुद्दा लावून धरला नाही. परिणामी, २५ कोटींचा निधी वाया गेला, अशी नाराजी विरोधी पक्षातून व्यक्त होत आहे.