महिला दिनाचे ठिकठिकाणी जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 11:26 PM2019-03-08T23:26:56+5:302019-03-08T23:27:11+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त मुंबापुरीमध्ये ठिकठिकाणी एकत्रित आलेल्या महिला, महिला संघटनांनी महिला दिनाचे जंगी सेलिब्रेशन केले.

Wisdom Celebration in Women's Day | महिला दिनाचे ठिकठिकाणी जंगी सेलिब्रेशन

महिला दिनाचे ठिकठिकाणी जंगी सेलिब्रेशन

Next

मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त मुंबापुरीमध्ये ठिकठिकाणी एकत्रित आलेल्या महिला, महिला संघटनांनी महिला दिनाचे जंगी सेलिब्रेशन केले. कार्यालये, टेÑनसह सोसायटी अशा प्रत्येक ठिकाणी महिला दिनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. विशेषत: सोशल नेटवर्क साईट्सने यात आणखी भर घातली. दिवसभर महिला दिनाच्या डिजिटल शुभेच्छा सोशल नेटवर्क साईट्सहून दिल्या जात होत्या. कॉर्पोरेट हबसह खासगी कार्यालये, सरकारी कार्यालये; अशा अनेक ठिकाणी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून वीरमाता व वीरपत्नींचा गौरव करण्यात
आला़
अनेक महिला संघटना, महिला गट, महाविद्यालयीन तरुणींनी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सोशल मीडियावर महिला दिनाची वेगळीच क्रेझ दिसून आली. प्रत्येक युजर्सनी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. टिष्ट्वटवरून #महिला दिन, #जागतिक महिला दिन, #वर्ल्ड वूमन्स् डे असे हॅशटॅग वापरून मेसेज व्हायरल करण्यात आले. सेलिब्रेटींनीही आपल्या चाहत्यांना महिला दिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या. या दिवशी महिला म्हणून आपल्या आईचे कौतुक प्रत्येक युजर्सनी केले.
जग बदलणे अशक्य नाही
कष्ट करण्यात लाजण्यासारखे काही नाही. त्यासाठी महिला कामगारांना आत्मसन्मान मिळायला हवा. त्याची ठिणगी आपल्या अंत:करणात पेटवायला हवी, तरच जग बदलणे आजच्या स्त्रीला अशक्य ठरणार नाही, असा विश्वास असंघटित महिला कामगार संघटक मधू बिरमोळे यांनी महिला दिनानिमित्त व्यक्त केला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आज ना. म. जोशी मार्ग येथे आर्य समाज हॉलमध्ये महिलांचा मेळावा भरविण्यात आला होता. घरकाम महिला संघटनेच्या अध्यक्षा मधू बिरमोळे प्रमुख पाहण्या म्हणून बोलत होत्या.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोशल सर्व्हिस लिग पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आरती देसाई होत्या. देसाई म्हणाल्या, आजच्या महिलांनी चूल-मूलपुरते सीमित राहून चालणार नाही, तर बदलत्या जगाचा वेध घेतला पाहिजे. सुनेला सासूने मुलगी मानावयास हवे आणि सुनेने सासूला आई म्हणायला हवे; तरच कुटुंबा-कुटुंबातील नाती घट्ट होऊन त्यातून एक सुदृढ समाज निर्माण होईल.
>कायदेविषयक व्याख्यान
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून एम. एस. विधि महाविद्यालयात कायदेविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मानवाधिकार व महिलांच्या प्रश्नांवर लढणारे अ‍ॅड़ अनुप अवस्थी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अवस्थी म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात आई, बहीण, मुलगी, पत्नी, आजी अशा रूपातील महिलेसोबत होते. वर्षातील एक दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याऐवजी पूर्ण वर्षभर साजरा करण्याची गरज आहे. निर्भया प्रकरणातील निकाल, कामाच्या ठिकाणी महिलांच्या छळाविरोधात विविध कायदे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. वकील म्हणून काम करताना स्वत:सोबत इतरांसाठी लढा देऊन दुर्बल घटकाला न्याय मिळवून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सामाजिक कामांना प्राधान्य देणे, मोफत कायदेविषयक शिबिर भरविणे अशा कामांमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. चांगला वकील होण्यासाठी चांगला माणूस होणे गरजेचे आहे. महिलांचा आदर करण्याची सुरुवात घरापासून सर्वांनी केल्यास वेगळा दिवस साजरा करण्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले. या वेळी प्राचार्या डॉ. नुसरत हाश्मी, दीपक मेश्राम, सलीम शेख, मंगेश जवळेकर, राघवन यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते़
>महिला सबलीकरणामध्ये एसटीचा मोलाचा वाटा
बस आगारातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, महिलांचे एसटी महामंडळातील योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. एसटीमध्ये ४ हजार ५०० महिला वाहक कार्यरत असून सुमारे ५०० महिला कर्मचारी इतर विविध पदांवर काम करीत आहेत. त्यांना काम करीत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, अशा प्रकारचे वातावरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निर्माण केले पाहिजे. भविष्यात महिला सबलीकरणामध्ये एसटीचा मोलाचा वाटा असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मधू खरात, सुकदेव सांगळे, प्रशांत कांबळे, दीपक जगदाळे आदी पदाधिकारी हजर होते. मुंबई विभागात जुलै २०१८ मध्ये लिपिक टंकलेखक या पदावर महिला खेळाडू भरती झाल्या. सिद्धिका चौलकर यांचा सन्मान केला़
>मध्य रेल्वेने साजरा केला हटके महिला दिन
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर शुक्रवारी तिकीट तपासणी करण्यात आली. या वेळी जागतिक महिला दिनानिमित्त तिकीट तपासणी पथकामध्ये सर्व महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. महिला तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी आणि अधिकारी यांनी सहभाग घेऊन रेल्वे नियम मोडून विनातिकीट प्रवास करणाºयांकडून दंड वसूल केला. महिला तिकीट तपासनीस ३०, रेल्वे सुरक्षा बलाच्या १४ महिलांनी ३१८ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. यांच्याकडून ७३ हजार १४० रुपये दंड वसूल करून मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर पाडली. यासह लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, माटुंगा, घाटकोपर, ठाणे, कल्याण येथे रेल्वेच्या महिला कर्मचाºयांनी वेगवेगळे कार्यक्रम ठेवून महिला दिन साजरा केला.
>सॅनिटरी नॅपकिन
वेंडिंग मशीन
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई विद्यापीठामध्ये सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई विद्यापीठात परीक्षेच्या कामासंदर्भात येणाºया विद्यार्थिनी आणि तेथे काम करणाºया महिलांना बराच वेळ विद्यापीठात घालवावा लागतो. त्यांना कोणताही आरोग्यविषयक त्रास होऊ नये, यासाठी ही सुविधा पुरविण्यात आली आहे. विद्यापीठातील महिला कर्मचारी व विद्यार्थिनींचे यामुळे सुटी घेऊन घरी जाण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मासिक पाळीचा थेट संबंध महिला आणि मुलींच्या आरोग्याशी येतो. परीक्षा आणि निकालाच्या कामासंबंधित अनेक विद्यार्थिनी मुंबई विद्यापीठात येतात. महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींचा संपूर्ण दिवस विद्यापीठात जातो. अशावेळी त्यांची ‘त्या’ दिवसांसाठीची योग्य सोय व्हावी, यानिमित्ताने सिनेट सदस्या सुप्रिया कायंदे यांनी संकल्पना मांडली असून, त्याची अंमलबजावणी केली.
>गुगलद्वारे हटके डुडल
महिला दिन जगभरात महिला शक्ती, महिला स्वातंत्र्य आणि महिलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो. त्यामुळे गुगलवरून महिलांना हटके शुभेच्छा देण्यात आल्या. गुगलने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष डुडल तयार करून स्त्री-शक्तीला सलाम केला. डुडलमध्ये एकूण १४ भाषांचा समावेश होता. या भाषांमधून महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायक संदेश देण्यात आले. यापैकी देशाची महिला बॉक्सर मेरी कॉमने दिलेला संदेश होता. यामध्ये ‘तुम्ही एक स्त्री आहात, म्हणून तुम्ही स्वत:ला कमकुवत समजू नका,’ असा मेरी कॉमचा संदेश गुगलने पोहोचविला.

Web Title: Wisdom Celebration in Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.