Join us

सज्ञान मुलगी तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सज्ञान मुलगी तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते. आम्ही किंवा तिचे पालक तिच्या या स्वातंत्र्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सज्ञान मुलगी तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते. आम्ही किंवा तिचे पालक तिच्या या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने एका २३ वर्षीय मुलीचा तिच्या प्रियकराच्या घरी राहण्याचा व त्याच्याशी विवाह करण्याचा मार्ग मोकळा केला.

एमबीएच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या मुलाने त्याच्या प्रेयसीच्या पालकांविरोधात पोलिसांत तक्रार केली; पण त्यातून काहीही साध्य न झाल्याने त्याने उच्च न्यायालयात हॅबिस कॉर्पस (हरवलेली व्यक्ती हजर करा) याचिका दाखल केली. याचिकेनुसार, मुलीच्या आई-वडिलांनी दोघांचे धर्म वेगळे असल्याने या विवाहाला आक्षेप घेतला. त्यांचे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे आणि मुलीच्या घरी याची माहिती मिळताच त्यांनी मुलीला मारहाण केली व मुलाच्या घरच्यांना शिवीगाळ केली. पोलिसांनी जबरदस्तीने मुलीला त्याच्या घरातून नेले. त्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला एक महिना गावाला ठेवले. तिच्याकडचा फोनही काढून घेतला.

उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला न्यायालयात हजर केले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. न्यायालयाने याबाबत मुलीकडे विचारणा करताच तिने आपल्याला प्रियकराकडे राहायचे असून, त्याच्याशी लग्न करायचे आहे व उर्वरित आयुष्य त्याच्याबरोबरच व्यतीत करायचे आहे, असे न्यायालयाला सांगितले. संबंधित मुलाबरोबर संपूर्ण आयुष्य घालविण्याबाबत ती बोलत आहे; पण लग्न न करताच ती त्याच्याबरोबर जात आहे, असे सरकारी वकील जयेश याग्निक यांनी न्यायालयाला सांगितले. ‘ती सज्ञान आहे आणि ती तिच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकते. आम्ही किंवा तिचे पालक तिच्या या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती तिच्या मर्जीनुसार कुठेही जाऊ शकते, हा कायदा आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.