मुंबई : गेल्या १५ दिवसांपूर्वी मुंबईतून मालमत्ता कक्षाने साडेचार फुटी मांडूळ जप्त केले होते. या कारवाईपाठोपाठ जादूटोण्यासाठी मुंबईत आणलेले चार फुटांचे मांडूळ मालमत्ता कक्षाने गुरुवारी रात्री जप्त केले आहेत. मांडुळाच्या तस्करीप्रकरणी २८ वर्षीय विपुल जोशी या टक्सी चालकाला अटक करण्यात आली आहे. जोगेश्वरी येथील रहिवासी असलेल्या शाहला गुरुवारी रात्री उशिराने रे-रोड येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले मांडूळ हे तीन किलो वजनाचे आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २५ लाख किंमत आहे. गुरुवारी बडी रात असल्याने, जादूटोण्यासाठी या मांडुळाला विक्रीसाठी आणण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, दीप बने, सुनील माने, चंद्रकांत दळवी यांच्या पथकाने सापळा रचून जोशीला बेड्या ठोकल्या आहेत. आधीच्या मांडूळ तस्करीमध्ये जोशीचे काही कनेक्शन आहे का? याचाही शोध मालमत्ता कक्ष घेत आहेत. पैशांचा पाऊस पडणे, गुप्तधन सापडणे, व्यवसायात भरभराट होणे अशा अंधश्रद्धेपोटी मांडुळला लाखो रुपये मोजून घरात ठेवले जात आहे, तर काही जण जादूटोणासाठी या मांडुळाचा वापर करतात. रे रोड मधून ताब्यात घेण्यात आलेले मांडूळ कोठून आणण्यात आले आहे? ते कोणाला विकण्यात येणार होते? याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालमत्ता कक्षाने दिली.
जादूटोण्यासाठी आणलेले मांडूळ जप्त
By admin | Published: May 13, 2017 1:27 AM