मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत निर्माण झालेल्या वादळानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत जाहीरपणे आपली भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं भवितव्य काय असेल हे स्पष्ट करतानाच बंडखोरांवरही खोचक शब्दांत निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोर आमदारांचे चक्क आभार व्यक्त केले. तर, बंडखोरांना आव्हानही दिलं आहे. राजीनामे द्या आणि निवडणुका लढा असे चॅलेंजच उद्धव ठाकरेंनी दिले. त्यावर, आता भाजपचे सहकारी पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टिका केली आहे.
शिवसेना धनुष्यबाण चिन्ह गमावणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर भूमिका मांडली आहे. धनुष्यबाण आमचाच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला खडसावलं. तसेच, मी आजही म्हणतो हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. मध्यावधी निवडणूक व्हायला हवी. मी चुकलो असेल तर जनता मला घरी बसवेल, अशा शब्दात बंडखोर आमदारांना आव्हान दिलं आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या या आवाहनावरुन सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.