Join us  

‘प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 8:19 AM

Eknath Shinde: सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी  प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा, तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी.

मुंबई : सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी  प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा, तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील १३ पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. 

शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी ही एकाच रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही समान वेगाने व समान पद्धतीने एकत्रित चालल्यास महाराष्ट्र हे देशातील सर्वार्थाने प्रभावी व लोककल्याणकारी राज्य बनेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. रोजगार हमी योजना, झिरो पेंडन्सी, ऑनलाइन कार्यप्रणाली, मध्यवर्ती टपाल कक्ष अशा विविध कल्पना आणि योजनांच्या माध्यमातून राज्याचे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उत्तम सेवा पुरविण्याचे काम करीत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार विजेतेकार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल नाशिक विभागीय कार्यालयास पहिला पुरस्कार मिळाला. ‘गव्हर्नमेंट टू सिटिझन’ प्रकारचे ई-गव्हर्नस डेटा शेअरिंग ॲपसाठी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना द्वितीय पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अधिकारी गटात तृतीय क्रमांक राजीव निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांना कमी कालावधीत नागरिकांना दस्त नोंदणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र वितरित करण्याच्या वेब ॲप्लिकेशन प्रणालीसाठी देण्यात आला.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई