Join us

'माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील' म्हणणारे झिरवळ अजित दादांच्या गटात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 8:59 PM

पहाटेच्या शपथविधीवेळी राज्यातील सत्तानाट्यामध्ये राष्ट्रवादीचे बेपत्ता झालेले आमदार पुन्हा पक्षात परततले होते

मुंबई - शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अकल्पनीय बंड झाले असून अजित पवार आमदारांचा मोठा गट घेऊन भाजपसोबत सत्तेत गेले आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं दिसून आलं. या राजकीय घडामोडीत जे मी शरद पवार साहेबांसोबतच... असं म्हणायचे तेही नेते मंडळी अजित पवारांच्या शपथविधीला हजर होते. अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी सोहळा केला, तेव्हा त्यांच्यासमवेत असलेले नहरहरी झिरवळ आजही दिसून आले. 

पहाटेच्या शपथविधीवेळी राज्यातील सत्तानाट्यामध्ये राष्ट्रवादीचे बेपत्ता झालेले आमदार पुन्हा पक्षात परततले होते. या बेपत्ता झालेल्या आमदारांपैकी एक असलेले नरहरी झिरवळ हेदेखील शरद पवारांच्या दिल्ली निवास्थानी पोहचले. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी बोलताना त्या घटनेचा धक्कादायक घटनाक्रम उघड केला होता. तसेच, शपथविधीचा कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्हाला कल्पना नव्हती, मला जे काही मिळालं आहे ते शरद पवारांच्या आशीर्वादामुळे मिळालं. लोकांनी निधी जमा करुन मला निवडून आलं आहे. ते मला बघून नाही तर शरद पवारांना बघून मतदान करतात, असेही झिरवळ यांनी म्हटलं होतं.  

माझ्या आई-वडिलांनंतर, गुरुजीनंतर मला मोठं करणारे शरद पवार आहेत. शरद पवारांचा विश्वासघात करणं म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं पाप असेल असंही नरहरी झिरवळ यांनी म्हटलं होतं. शरद पवारांवरील निष्ठा कमी होणार नाही, माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील. ज्यांच्यावर निष्ठा ठेवली त्याचा विश्वासघात करणार नाही असं स्पष्टीकरण त्यावेळी, आमदार नरहरी झिरवळ यांनी दिलं होतं. मात्र, आज नरहरी झिरवळ हे शरद पवारांसोबत नसून ते अजित पवारांसोबत आहेत. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला ते हजर होते. 

दरम्यान, अजित पवारांच्या बंडखोरीला आपला पाठिंबा नसून त्यांच्या शपथविधीलाही आमचं समर्थन नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच, आपण उद्यापासूनच नव्याने पक्षबांधणीच्या मोहिमेवर निघणार असून कराडमधील यशवंत चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारनरहरी झिरवाळअजित पवार