Join us

"शरद पवार यांच्या मान्यतेने मार्चमध्येच आम्ही एनडीएमध्ये सहभागी"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 6:16 AM

प्रफुल पटेलांचा दावा, आमचाच पक्ष अधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अधिकृतरीत्या एनडीएला पाठिंबा द्यावा, असे लेखी पत्र शरद पवार यांच्या परवानगीने मार्चमध्येच दिले होते. त्याच वेळी खरे तर आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

आज आम्ही एनडीएचे घटक झाले असलो तरी नागालँडमधील आमदारांना परवानगी दिली गेली, त्याचवेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो हे सिद्ध होते, असेही पटेल म्हणाले. महाराष्ट्रातील विधानसभेचे ५३ पैकी ४३, तर विधान परिषदेचे ९ पैकी ६ आमदार आमच्या बाजूने आहेत. नागालँडमधील ७ आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधीच्या संख्येचा विचार करता, आमचा पक्षच अधिकृत आहे. त्याचबरोबर आमच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केल्याने केवळ महाराष्ट्र आणि नागालँडमध्येच पक्षाची मान्यता आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे निवडून न येता नियुक्त केलेले आहेत. त्यामुळे हे पक्षाच्या घटनेत कायद्याने योग्य व अधिकृत नाही, असा दावाही पटेल यांनी केला.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नागालँडमधील आमदार आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी छगन भुजबळ हेही उपस्थित होते.

शरद पवारांशी वैयक्तिक शत्रुत्व नाही!  शरद पवार हे आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्यासोबतची आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक शत्रुत्व नाही. राजकीय जीवनात शिष्टाचार पाळावा लागतो.  त्यामुळे भेटणे, फोटो काढणे यात काही गैर नाही, असा खुलासाही पटेल यांनी केला.

निवडणूक आयोगात ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणी सुरू होऊन ती साधारणतः १५ दिवसांत संपेल. अजित पवार गटाने सर्व कायद्याचा अभ्यास करूनच निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या सुनावणीबाबत आमच्या मनात ‘किंतू’ असणार नाही, असे पटेल यांनी सांगितले.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई