मुंबई : चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहिम आणि अणुशक्तीनगर अशा सहा विधानसभा मतदारसंघांना सामावून घेणाऱ्या दक्षिण-मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत धारावीचा पुनर्विकास हाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचे मानले जाते. कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी न्याय यात्रेच्या मुंबईतील सांगतेच्या आदल्या सायंकाळी धारावीत भाषण करताना धारावी पुनर्विकासाच्या अनुषंगाने सरकारवर टीकास्त्र सोडले. किंबहुना, मणिपूर येथून यात्रा सुरू करण्याचे कारण स्पष्ट करतानाच आवर्जून धारावी येथे यात्रेची सांगता केल्याचेही राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात धारावीच्या पुनर्विकासाच मुद्दा गाजण्याचे संकेत आहेत.
राखीव जागेसाठी या मतदारसंघातून निवडणूक होते. वास्तविक २००४ च्या लोकसभा निवडणुकीपासून धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, यंदा पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला मिळाले असून सर्वेक्षणालाही सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातील अन्य विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत धारावी विधानसभा मतदारसंघातून एक गठ्ठा व विक्रमी मतदान होते. त्यामुळेच तेथील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील झाले आहेत.
धारावीत आदिद्रविड, नाडर, थेवर या तामिळनाडू येथील तर महाराष्ट्रातील चर्मकार समाज, भटक्या विमुक्त जमातीमधील लोक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, कर्नाटक, राजस्थानी अशा विविध प्रांतातील बहुविध जातींच्या व धर्माच्या लोकांच्या वस्तीचे प्राबल्य आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी धारावीतील विविध संस्था, कंपन्या, कुटीर उद्योग संघटना आदींशी संबंधित लोकांशी चर्चा सुरू केली आहे.
राखीव मतदारसंघ असल्यामुळे येथून वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही येथून निवडणूक लढण्यात स्वारस्य असल्याची माहिती आहे. तर, दीर्घकाळ कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात २०१४ पासून शिवसेनेचे राहुल शेवाळे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत राजकीय गणिते बदलल्यानंतर आता शिवसेनेच्या अनिल देसाई यांनीही त्या मतदारसंघात विशेष रस घेण्यास सुरुवात केली आहे. तर, कॉँग्रेसकडून वर्षा गायकवाड लोकसभेच्या रिंगणात उतरणार का, हादेखील चर्चेचा विषय आहे.
धारावीच्या पुनर्विकासाखालोखाल कोळीवाड्यांचा विकास, देवनाग डम्पिंग ग्राऊंड, माहुलमधील प्रदूषणाचा प्रश्न, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, रेल्वे स्थानकाबाहेर वाढणारी गर्दी आणि अन्य नागरी समस्यादेखील निश्चित चर्चेत असतील. मात्र, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांच्या भाषणात धारावीचा पुनर्विकास याच मुद्याची अधिक चर्चा होताना दिसेल.