मुंबई : एसटी महामंडळ शासनात विलीनीकरण करावे यासाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावून संपात फूट पडण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसटी महामंडळाने कारवाईची नोटीस तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भाजपने दिला आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, आज आम्ही राज्यभरात एसटी महामंडळाच्या आगारात टाळे ठोकण्याचे आंदोलन करणार होतो, पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले म्हणून हे आंदोलन केले नाही. मात्र, जर सरकार जागे झाले नाही तर आम्ही ते आंदोलन करणार आहोत. शासनाने दोन दिवसांत अभ्यास करून तत्काळ निर्णय घ्यावा. यासोबतच कारवाईची तत्काळ नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू. संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी
महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. दोन हजारपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची नोटीस बजावली आहे. याशिवाय एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याच्या प्रसारमाध्यमावर खोट्या बातम्या पसरवून एसटीच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. मात्र, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, पहिल्या दिवसापासून ज्या भावना आहेत, त्या आजही कायम आहेत. हे आंदोलन कोणत्या पक्षाचे नसून गोरगरीब मराठी कर्मचाऱ्यांचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आझाद मैदानवरील आंदोलन सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले.
दुप्पट कर्मचारी झाले कामावर हजर
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र एसटी कामगार कर्तव्यावर हजर होण्याचे प्रमाण मात्र वाढत आहे. रविवार पेक्षा सोमवारी राज्यात कर्मचारी कर्तव्यावर हजर होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली असून दिवसभरात १,३१७ प्रवाशांनी प्रवास केला आहे.कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी १,५००, शनिवारी तीन हजार, रविवारी ३,९८७ तर सोमवारी ६,८९५ कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहे. तर प्रत्यक्षात ८५,३७१ कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. सोमवारी राज्यात १५ मार्गावर शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण ५१ बस धावल्या.