Join us

राजकीय संन्यासाच्या निर्णयावरून माघार; नीलेश राणेंची फडणवीस-चव्हाणांशी चर्चा यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 6:03 AM

...म्हणून नीलेश राणे होते नाराज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय माजी खासदार नीलेश राणे यांनी काही तासांतच मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजिनक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. 

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर तिघांमध्ये चर्चा झाली. लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना एकदिलाने काम करण्याची गरज आहे. एकमेकांबद्दल काही तक्रारी असतील तर त्या माझ्याकडे सांगा; जाहीर वाच्यता करण्याची गरज नाही, असे फडणवीस यांनी या दोघांनाही सांगितल्याचे समजते. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय ऐन दसऱ्याच्या दिवशी जाहीर करून खळबळ उडवून दिली होती. त्यांनी हा निर्णय का घेतला, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात होते. नारायण राणे, नीलेश राणे यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी काही मुद्यांवर मतभेद असल्याचेही मध्यंतरी वृत्त होते. राणे म्हणजे भाजप असे स्थानिक पातळीवरील चित्र बदलण्याचे प्रयत्न मंत्री चव्हाण करीत असल्याची किनार या मतभेदांना असल्याचेही म्हटले जात होते. त्यातच आपले बंधू किरण सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (शिवसेना) उमेदवार म्हणून उतरविण्याची तयारी उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चालविली असल्याचे चित्र आहे.

... म्हणून नीलेश राणे होते नाराज

भेटीनंतर रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही नेतेमंडळी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करतो. परंतु, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या ज्या भावना असतात त्यासुद्धा नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. या भावना जाणून न घेतल्याने नीलेश राणे नाराज होते. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे ते नेते आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यादृष्टीने त्यांनी रागावून तो निर्णय घेतला. परंतु; मी, नारायण राणे, नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांच्या समस्यांमध्ये यापुढे प्रामुख्याने लक्ष घालू. पूर्वीसारखे काही घडणार नाही, असे त्यांना आश्वासित केले आहे. नीलेश राणेंच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच कोकणातील सर्व भागात त्यांचा झंझावात आगामी काळात सुरू राहील.

रवींद्र चव्हाण यांनी आधी सकाळी नीलेश राणे यांची भेट घेतली व नंतर दोघे फडणवीस यांना भेटले. तिघांमधील भेटीनंतर चव्हाण माध्यमांशी बोलले. नीलेश यांनी मात्र प्रतिक्रियेस नकार दिला.

 

टॅग्स :निलेश राणे भाजपा