विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 19:23 IST2025-04-12T19:21:42+5:302025-04-12T19:23:53+5:30
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभेला माघार घेतली, आता ठाकरेंनी सुधीर साळवींवर सोपवली मोठी जबाबदारी
विधानसभा निवडणुका होऊन चार महिने उलटले. या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण, त्यावेळी त्यांनी माघार घेतली. दरम्यान, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने साळवी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्येच सुधीर साळवी यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता पक्षाने सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. यामुळे आता त्यांना लालबागचा राजा पावला, अशा चर्चा सुरू आहेत. काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पक्षातील मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपानेही निवडणुकीची मोठी तयारी केली आहे. शिवसेना ( ठाकरे गटाने ) मराठीचा मुद्दा पुढे आणला आहे. तर मनसेनेही मराठी मुद्द्यावरुन तयारीला सुरूवात केली आहे.
दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रवक्ते यांची नावे जाहीर केली आहेत.यानंतर आता सुधीर साळवी यांना पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. लालबाग परिसर हा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. आता काही दिवसातच महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत . यामुळे आता मोक्याच्या वेळीच साळवी यांच्याकडे पद देऊन ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा सुरू आहे.