दोन वर्षांत साडेआठ कोटींचा गुटखा जप्त
By admin | Published: July 20, 2014 11:21 PM2014-07-20T23:21:00+5:302014-07-20T23:21:30+5:30
मागील दोन वर्षांत केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने सुमारे ८ कोटी ५९ लाख ६१ हजारांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी असा माल जप्त केला आहे
ठाणे : मागील दोन वर्षांत केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने सुमारे ८ कोटी ५९ लाख ६१ हजारांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी असा माल जप्त केला आहे. गुटखाबंदीला २० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत असून, यापुढे सुद्धा वर्षभर गुटखाबंदी कायम राहणार आहे. पुढील १९ जुलै २०१५ पर्यंत गुटख्यावरील कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने कोकण विभागासह आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली.
ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षांमध्ये सुमारे दोन हजार ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. त्यातील सुमारे १३८ ठिकाणी गुटख्याचे साठे आढळून आले असून, त्यातील १०५ जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून, ७९ प्रकरणांमध्ये उत्पादकांपर्यंत तपासणीसाठी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ८ कोटी ५९ लाख ६१ हजारांच्या मालापैकी साडेपाच कोटींचा माल देवनार व पुणे येथे नष्ट करण्यात आला असून, उर्वरित माल नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुटख्यातून राज्य शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च यापासून उद्भवणाऱ्या आजारांवर होत असल्याने गुटखाबंदीतून सकारात्मक परिणाम समोर येत असल्याने ही बंदी योग्य ठरत असल्याचे नागपूरच्या दंत संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. (प्रतिनिधी)