मुंबई : एका वर्षाच्या आत मानवरहीत फाटक बंद करा, असे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाच्या बैठकीत दिले. रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी गोयल यांनी रेल्वे बोर्डाच्या अधिकाºयांची बैठक गुरुवारी बोलावली होती. बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अपघाताचा आढावा घेतला, या वेळी गोयल यांनी हे आदेश दिले. यापूर्वी मानवरहीत रेल्वे फाटक बंद करण्यासाठी तीन वर्षांचे लक्ष निश्चित करण्यात आले होते.मानवरहीत रेल्वे फाटक आणि रुळावरून डबे घसरणे, यामुळे रेल्वे अपघात होतात. हे रोखण्यासाठी रेल्वेत ‘स्पीड’, ‘स्किल’ आणि ‘स्केल’ या धर्तीवर कामे करण्याचे आदेश पीयूष गोयल यांनी दिले. रेल्वे अपघात रोखण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना रेल्वेमंत्र्यांनी केली. नुकत्याच झालेल्या अपघातांची रेल्वे बोर्डातील अधिकाºयांनी रेल्वेमंत्र्यांना माहिती दिली. मानवरहीत रेल्वे फाटकावर २०१६-१७ या कालावधीत ३४ टक्के अपघात झाले आहेत. नादुरुस्त रूळामुळे एक्स्प्रेस बोगी रुळावरून घसरते, अशी कारणे बोर्डाने दिली. तर रेल्वेत सुरक्षितता हीच प्राथमिकता असून, यात तडजोड करू नये, अशा सूचना रेल्वेमंत्र्यांनी दिल्या.रेल्वेमंत्र्यांची पाच कलमी योजना- रेल्वेमार्गावरील मानवरहीत रेल्वे फाटक हटविण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. आता हे लक्ष स्पीड, स्किल, स्केलअंतर्गत एका वर्षाच्या आत साध्य करण्याचे आदेश देण्यात आले.- सर्व रेल्वे रुळांची तपासणी करण्यात यावी. शक्य ते रेल्वे रूळ बदलण्यात यावे. दुर्घटनेच्या दृष्टीने संवेदनशील रूळ अधोरेखित करून, ते प्राथमिकतेने बदलावे.- नवीन रेल्वे रूळ विकत घेण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी.- यापुढे केवळ एलएचबी बोगी तयार कराव्यात. पारंपरिक पद्धतीच्या आयपीएफ बोगी निर्माण प्रक्रिया बंद कराव्यात.- सर्व इंजिनमध्ये धुके प्रतिरोधक एलईडी लाइट बसविण्यात यावे.
एक वर्षाच्या आत रेल्वे फाटक बंद करा, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे रेल्वे बोर्डाच्या बैठकीत आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 3:26 AM