मुंबई - उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. पण हा निकाल उद्धव सेनेने अजून ही स्वीकारलेला नाही.
या निकालात झोलझाल झाल्याचा आरोप करत युवासेनेकडून या मतदारसंघात ठिकठिकाणी जंक्शनवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उद्धव सेनेने निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात न्यायालयीन लढाईची तयारी सुरु केली आहे.
युवासेनेकडून या मतदारसंघात "न करता कुठलाही झोलझाल, लागेल का निवडणुकीचा निकाल" या मथळ्याखाली आरेचेक नाका, शांताराम तलाव, मालाड रेल्वे स्थानक, गोरेगाव एमटीएनएल या विविध ठिकाणी जंक्शनवर लावलेले बॅनर हे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, अमोल कीर्तिकर यांचा हा चोरून घेतलेला विजय असून याविरोधात निवडणूक आयोगाला जागे करण्याकरीता आणि जनतेच्या न्यायालयात या झोलझाल विजयाबद्दल जनजागृती करण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्यावतीने अशा पद्धतीने विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचे युवासेना कार्यकारणी सदस्य अंकीत प्रभू आणि रुपेश कदम यांनी सांगितले.