स्वच्छतेशिवाय महासत्तेचे स्वप्न अधुरे
By Admin | Published: October 3, 2015 03:04 AM2015-10-03T03:04:12+5:302015-10-03T03:04:12+5:30
देशातील बरेच लोक अजूनही उघड्यावर शौचास जातात. हे चित्र बदलणे गरजेचे असून जोपर्यंत भारत स्वच्छ होत नाही, तोपर्यंत आपण महासत्ता होऊ शकणार नाही
मुंबई : देशातील बरेच लोक अजूनही उघड्यावर शौचास जातात. हे चित्र बदलणे गरजेचे असून जोपर्यंत भारत स्वच्छ होत नाही, तोपर्यंत आपण महासत्ता होऊ शकणार नाही. त्यासाठी कार्यशाळा, प्रबोधन व लोकसहभागातून स्वच्छतेचा जागर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहरे हागणदारीमुक्त केल्याबद्दल नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी दापोली, वेंगुर्ले, पन्हाळा, मलकापूर (कोल्हापूर), महाबळेश्वर, भगूर, मलकापूर (सातारा), वाई, पाचगणी, रोहा, खेड, चिपळूण, गुहागर, माथेरान, मोवाड, महाड, करमाळा, कुर्डूवाडी या नगरपालिकांसह बृन्हमुंबई महानगरपालिकेतील ‘बी’ व ‘सी’ वॉर्ड हागणदारीमुक्त घोषित झाल्याबद्दल महापौर स्नेहल आंबेकर व आयुक्त अजय मेहता, अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि संबंधित नगरपालिकांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. २ आॅक्टोबर २०१७पर्यंत दर तिमाहीच्या अंतराने राज्यातील २६५ शहरे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी
माहिती सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
वाशीम जिल्ह्यातील संगीता नारायण आव्हाडे यांनी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधल्याबद्दल, यवतमाळ जिल्ह्यातील चैताली राठोड यांनी लग्नात दागदागिन्यांना फाटा देऊन वडिलांकडून प्री फॅब्रिकेटेड शौचालय घेतल्याबद्दल तर सिन्नर, जि. नाशिक येथील सुवर्णा लोखंडे यांनी महिला बचत गटाकडून कर्ज घेऊन शौचालय बांधल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना महाराष्ट्राच्या स्वच्छतादूत म्हणून घोषित केले.