Join us  

ठेकेदार नसल्याने पालिकाच गाळात

By admin | Published: February 25, 2016 4:22 AM

कधी कमी तर कधी जास्त बोली लावून ठेकेदारांनी महापालिकेला जेरीस आणले आहे़ यामुळे नालेसफाईचे काम लांबणीवर पडल्याने प्रशासनाने ठेकेदारांपुढे गुडघे न टेकण्याचा निर्धार केला

मुंबई : कधी कमी तर कधी जास्त बोली लावून ठेकेदारांनी महापालिकेला जेरीस आणले आहे़ यामुळे नालेसफाईचे काम लांबणीवर पडल्याने प्रशासनाने ठेकेदारांपुढे गुडघे न टेकण्याचा निर्धार केला आहे़ निविदा मागविण्याचे तीन प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर वॉर्डस्तरावर नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़नालेसफाईच्या कामात दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर पालिकेने ३२ ठेकेदारांना निविदा प्रक्रियेतून बाद ठरविले़ त्यामुळे ठेकेदारांनीही असहकार पुकारल्याने पालिकेच्या अडचणीत भर पडली़ त्यानंतर निविदेची अट तीन वेळा शिथिल करून पालिकेने ठेकेदारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्नही केला़ मात्र पावसाळ्याला तीन महिने उरले तरी अद्याप नाल्यांच्या सफाईला सुरुवात झालेली नाही़अखेरचा प्रयत्न म्हणून दर कमी करण्यासाठी ठेकेदारांशी वाटाघाटी करण्यात येणार आहेत. त्यानंतरही ठेकेदार राजी न झाल्यास पालिका स्वत:च नालेसफाई करून घेणार आहे़ पालिका मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत आयुक्त अजय मेहता यांनी तसे आदेश सर्व परिमंडळांच्या उपायुक्तांना दिले आहेत़ पावसाळ्यात तुंबणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई करून घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)