- मनोहर कुंभेजकर, मुंबईकांदिवली पूर्वेकडील भीमनगरात लागलेल्या आगीला सोमवारी एक आठवडा उलटला. ऊन आणि थंडीचा सामना करत रहिवाशांनी स्वत:च सरकारच्या मदतीशिवाय पुन्हा झोपड्या उभारल्या आहेत. या आगीत ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना सामाजिक संस्था आणि लोक सहभागातून निवारा मिळाला आहे. सोमवारी तब्बल आठ दिवसांनी पीडितांनी आपल्या हक्काच्या झोपडीत चुली पेटविल्या.वांद्रे (पूर्व) येथील बेहरामपाडा येथील लागलेल्या आगीतील पीडितांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आघाडी सरकारने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. पण सध्या सत्तेत असलेल्या युती सरकारने कांदिवली आगीतील पीडितांना केवळ ३ हजार ८०० रुपये देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, असा आरोप येथील झोपडपट्टीधारकांनी केला आहे.आग्नितांडवामध्ये हजारो कुटुंबे उघड्यावर आल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यापैकी कोणीही या भागात फिरकले नाही. झोपडपट्टीतील रहिवाशांना पालिकेने गेली १५ वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले आहे. पण झोपड्या जळाल्यानंतर येथील झोपडपट्टीत नळजोडणी मिळाल्याने पीडितांना मोठा आधार मिळाला आहे. विविध संस्था आणि लोकांनी केलेल्या मदतीच्या जोरावर झोपडीत चुली पेटल्याने आज येथील रहिवाशांनी कुटुंबासोबत दोन घास खाल्ले. झोपडीचा प्रश्न सुटला असला तरी आता मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अजून बाकी आहेच. सर्व काही जळून खाक झाल्याने मुलांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे, असा प्रश्न येथील पालक आणि विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.
सरकारच्या मदतीशिवाय पुन्हा उभे राहिले संसार
By admin | Published: December 16, 2015 3:48 AM