No Mask in Mumbai: मुंबईकरांनी हलक्यात घेतले, विना मास्क फिरणारे वाढले; दिवसभरात सात हजार लोकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 09:20 PM2021-10-08T21:20:36+5:302021-10-08T21:20:36+5:30
coronavirus Mask in Mumbai: गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने विना मास्क फिरणाऱ्या दररोज सरासरी दहा हजार नागरिकांना दंड करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत सार्वजनिक परिसरात गर्दी वाढली आहे. मात्र तोंडाला मास्क लावणे अनिवार्य असतानाही विना मास्क फिरणारे वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा सात हजार ८१ नागरिकांना पालिका आणि पोलिसांनी एका दिवसात १४ लाख १६ हजार दोनशे रुपये दंड वसूल केला आहे. तर एप्रिल २०२० पासून आतापर्यंत ७५ कोटी सहा लाख दोन हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने विना मास्क फिरणाऱ्या दररोज सरासरी दहा हजार नागरिकांना दंड करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. एप्रिल २०२० पासून मुंबईत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या ३६ लाख सात हजार ३२७ नागरिकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाई तीव्र....
मागीलवर्षी गणेशोत्सवानंतर मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढला होती. या काळात नागरिकांच्या भेटीगाठी वाढतात. त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. पावसाळा संपल्यानंतर मुंबईत येणाऱ्या स्थालांतरीत कामगारांची संख्याही जास्त असते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आता कमी असला तरी सण उत्सवामुळे रुग्ण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून पालिकेने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवरील कारवाई तीव्र केली आहे.
७ ऑक्टोबर रोजी केलेली कारवाई
कारवाई ... नागरिक ... दंड
पालिका - ४७७८ ... नऊ लाख ५५ हजार ६००
पोलिस.... २३०३...चार लाख ६० हजार ६००
एप्रिल २०२० ते ७ ऑक्टोबर २०२१ - एकूण कारवाई ३६ लाख सात हजार ३२७ लोकांकडून ७५ कोटी सहा लाख दोन हजार ६०० दंड वसूल