मुंबई : माझे मानसिक व शारीरिक आरोग्य खालावत आहे. मला वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, तर माझा मृत्यू होईल, असे भावनिक आवाहन शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने जामीन मिळविण्यासाठी विशेष न्यायालयाला सोमवारी केले. सरकारी वकील आपल्याविरोधात कट रचत आहेत, असा आरोपही इंद्राणीने न्यायालयात केला.
या केसमध्ये पुढील साक्षीदार राहुल मुखर्जी आहे, असे एक वर्षापूर्वी सरकारी वकिलांनी सांगितले होते. १४ महिने उलटूनही त्याला (राहुल मुखर्जी) साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर करण्याचे काहीही चिन्ह नाही. पुढील साक्षीदार राहुल मुखर्जी असणार आहे, असे म्हणत न्यायालयाने यापूर्वी केलेला जामीन अर्ज फेटाळला होता. या सर्व घटनेकडे बघितलं, तर सरकारी वकील माझ्याविरुद्ध कट रचत आहे, असे वाटते, असे इंद्राणीने नव्याने केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे. ‘माझी तब्येत खालावत असल्याने मी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा विचार करत आहे, परंतु पीटर मुखर्जीने अलीकडेच खासगी रुग्णालयात घेतलेले उपचार पाहता, दररोज ३८,००० रुपये खर्च करण्याची माझी ऐपत नाही, तसेच मी सध्या जिथे आहे, तिथे डॉक्टरांना भेटण्याची सुविधा मला उपलब्ध नाही. माझे कुटुंबही येथे नाही.मुलगी परदेशात शिक्षण घेत आहे.
या बाबी समजल्यावर माझी चिंता वाढली आहे. केवळ खासगी रुग्णालयात उपचार घेणे हे माझ्यासाठी पुरेसे नाही, असे इंद्राणीने विशेष न्यायालयाला तिने दाखल केलेल्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना सांगितले. घडलेल्या या सर्व घटनांमुळे मुलीवर (विधी) मानसिक आघात झाला आहे. त्यामुळे या सर्वातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारांची आवश्यकता आहे, असे इंद्राणीने न्यायालयाला सांगितले.पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला‘सर्व सुविधा मिळविण्याची परवानगी असतानाही त्या घेण्याआधीच माझा मृत्यू का व्हावा? व्हिडीओ कॉलद्वारे मला डॉक्टरांशी बोलायला मिळाले नाही, तर माझा मृत्यू होईल. मला जगण्याची संधी द्यावी, अशी मी विनंती करते. मी जे कृत्य केले नाही, त्या कृत्यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे,’ असे इंद्राणीने भावुक होत न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने बचावपक्षाच्या व सरकारी वकिलांना हा खटला जलदगतीने संपविण्याचे निर्देश देत, पुढील सुनावणी ८ नोव्हेंबर रोजी ठेवली.