गरीब उपचाराविना राहणार नाहीत
By admin | Published: December 5, 2015 09:09 AM2015-12-05T09:09:25+5:302015-12-05T09:09:25+5:30
पैसे नाहीत म्हणून राज्यात एकही गरीब उपचाराविना राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळ येथे दिली. रुग्णांवर उपचारासाठी मंत्रालयात सहाय्यता
नवी मुंबई : पैसे नाहीत म्हणून राज्यात एकही गरीब उपचाराविना राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरूळ येथे दिली. रुग्णांवर उपचारासाठी मंत्रालयात सहाय्यता कक्ष सुरू केला असून त्याद्वारे अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. नेरूळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयात मुख्यमंत्री मदतनिधीतून ५० मुलांच्या हृदयरोगावर शस्त्रक्रिया केली जाणार असून त्या उपचार कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
बिहारचे राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, डॉ. विजय पाटील, आमदार मंदा म्हात्रे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, डॉ. अजिंक्य पाटील, धर्मादाय आयुक्त शशिकांत साबळे उपस्थित होते.
अनेक संस्था मोठे साम्राज्य उभे केल्यानंतरही समाजाला काही देण्याची त्यांची प्रवृत्ती नसते याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. तर राज्यातल्या ४६० चॅरिटी रुग्णालयांकडून २० टक्के चॅरिटी पूर्ण व्हावी यासाठी पाठपुरावा करावा लागत असल्याची खंत धर्मादाय आयुक्त शशिकांत साबळे यांनी व्यक्त केली. मात्र डी. वाय. पाटील रुग्णालयाकडून कोणत्याही पाठपुराव्याशिवाय ८० टक्के चॅरिटी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. २०१३ पासून ४४ हृदयरोग रुग्णांवर उपचार रखडला होता. अनेक चॅरिटी रुग्णालयाकडे यासंबंधीचा पाठपुरावा करूनही सर्वच रुग्णांवर उपचारासाठी अनेक रुग्णालयांनी असमर्थता दाखवली. अखेर ही बाब बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्यापुढे मांडताच त्यांनी सर्वच रुग्णांवर उपचाराची तयारी दाखवल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात प्रत्येक महिन्याला शिबिर घेवून गंभीर रुग्णांवर उपचार केला जाईल, असेही शेट्टे यांनी सांगितले.