लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सतत बिघडणारी इंजिने आणि दोलायमान आर्थिक स्थिती यांमुळे २ मेपासून जमिनीवरच असलेल्या गो-फर्स्ट या विमान कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. आता गो-फर्स्टचे किमान १५० कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्यात ३० वैमानिक आणि ५० केबिन कर्मचारी यांचा समावेश आहे. कंपनी अडचणीत असली तरी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून जाऊ नये, यासाठी कंपनीच्या कर्चमाऱ्यांच्या पगारात सुधारणा करण्यात आली होती. मात्र, मे महिन्यापासून आतापर्यंत सुधारित वेतन न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी आता अन्यत्र नोकरी शोधण्यास सुरुवात केली आहे.
२ मेपासून जमिनीवर असलेल्या गो-फर्स्टने दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता. तो मान्य झाल्यानंतर आता कंपनीवर नेमलेल्या प्रशासकाने दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण करत कंपनीच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्नही सुरू केले आहेत. यानंतर कंपनीने नागरी विमान महासंचालनालयाकडे (डीजीसीए) पुन्हा उड्डाण करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला २१ जुलै रोजी काही अटी व शर्तींसह पुन्हा उड्डाण करण्याची अनुमती दिली होती. यानंतर कंपनीने आपल्या ताफ्यातील विमानांची तांत्रिक स्थितीदेखील आता तपासण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, कंपनीच्या ताफ्यात एकूण ५२ विमाने असून, त्यापैकी २६ विमानांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती विमाने जमिनीवरच आहेत. त्यामुळे आता पुन्हा उड्डाणाची परवानगी मिळाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी १५ विमानांसह विमानसेवा सुरू करणार असल्याचे समजते. या १५ विमानांच्या माध्यमातून देशातील प्रमुख हवाई मार्गांवर दिवसाकाठी ११४ फेऱ्या करण्याची कंपनीची योजना आहे.