परिवहन सेवेचा गाडा व्यवस्थापकाविना
By admin | Published: January 3, 2015 01:08 AM2015-01-03T01:08:57+5:302015-01-03T01:08:57+5:30
महानगरपालिका परिवहन सेवेतील (एनएमएमटी) व्यवस्थापकपद दहा महिन्यांपासून रिक्त आहे. कार्यकारी अभियंत्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नवी मुंबई : महानगरपालिका परिवहन सेवेतील (एनएमएमटी) व्यवस्थापकपद दहा महिन्यांपासून रिक्त आहे. कार्यकारी अभियंत्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जबाबदार अधिकारीच नसल्यामुळे परिवहनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला २० वर्षे पूर्ण होत आहेत. या उपक्रमाच्या स्थापनेपासून परिवहन व्यवस्थापकपद अस्थिर राहिले आहे. दोन दशकांच्या काळात २३ जणांनी या पदावर काम केले आहे. प्रशासन हाताळण्यासाठी सक्षम व्यक्ती मिळत नसल्यामुळे उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सद्यस्थितीमध्ये मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, कल्याण, डोंबिवलीपर्यंत ४७ मार्गांवर ३१० बसेस धावत आहेत. परंतु प्रत्येक वर्षी उपक्रमाचा तोटा वाढत आहे. बसेसविषयी प्रवासी वारंवार तक्रारी करत असतात. बेस्टच्या तुलनेमध्ये एनएमएमटी बसेसची स्वच्छता व सेवेचा दर्जा अत्यंत सुमार असून धावत्या बस मार्गावर बंद पडण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत.
परिवहन व्यवस्थापक घनश्याम मांगळे यांची ५ मार्च २०१४ मध्ये बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. यामुळे उपक्रमातील कार्यकारी अभियंता शिरीष आरदवाड यांच्यावर परिवहन व्यवस्थापकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरदवाड हे तांत्रिक विभागाचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्याकडून बसेसची दुरुस्ती व देखभाल हेच काम करून घेतले पाहिजे. तांत्रिक विभागाच्या व्यक्तीकडे प्रशासनाचा कारभार सोपविला जात नाही. परंतु पर्यायी व्यवस्थाच नसल्यामुळे त्यांच्यावर प्रशासन चालविण्याची जबाबदारीही सोपविण्यात आलेली आहे. तब्बल दहा महिने व्यवस्थापक नसल्यामुळे आता कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उपक्रमाचा तोटा कमी करून प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल तर व्यवस्थापकपद लवकर भरण्याची आवश्यकता असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
गोंधळलेला कारभार
च्व्यवस्थापकाअभावी एनएमएमटीचे कामकाज धीम्या गतीने सुरू आहे.
च्महापे डेपोच्या जागेचा तसेच सीवूड डेपोचा वापर होत नाही. तोट्यातील सेवांबाबात तसेच नवीन मार्गांबाबत निर्णय रखडले. तोटा दिवसागणीक वाढत असून बस थांब्यांपासून देखभाल दुरुस्तीची अनेक कामे संथगतीने सुरू आहेत.
परिवहन व्यवस्थापकपद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. याशिवाय महापालिकेसाठी उपआयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदासाठीही अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. लवकर ही पदे भरली जावीत यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. एनएमएमटीच्या कामाचा नुकताच आढावा घेतला असून कामकाजामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.
- आबासाहेब जऱ्हाड,
आयुक्त, महानगरपालिका
च्प्रवाशांचा प्रतिसादाअभावी तोट्यात सुरू असलेले १०१, १०४ व १३३ क्रमांकाच्या तीन बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सांताक्रुझ विमानतळ व लोखंडवाला या मार्गावर या बसेस धावत होत्या. परिवहन उपक्रमातर्फे नवी मुंबईसह, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या मार्गावर बस चालवल्या जात आहेत.सुरूवातीपासून प्रतिदिन नाममात्र प्रवासीच या बसने प्रवास करत होते. त्यामुळे अनेक दिवस तोटा सहन करत या बस चालवल्या जात होत्या. अखेर काही दिवसातच हे तीनही मार्ग बंद करण्यात आल्याचे परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.
सीएनजी बसेसची दैना
सीएनजीच्या बसेस सतत कंप पावत असल्याने आतमधील सीट तुटत असून बसेची दैना झाली आहे. त्यामुळे गतवर्षात एनएमएमटीला २०० सीट बदलाव्या लागल्या आहेत. परिवहन उपक्रमाकडील एकूण बसेसपैकी १६१ सीएनजी बस आहेत. पालिका क्षेत्रासह बाहेरच्या अनेक मार्गांवर देखील या बस चालवल्या जातात. परंतु एनएमएमटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तुटक्या सीटचा त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेल्या सीटच्या जागी उभे राहून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तुटलेल्या सीटच्या बस धावत असलेल्या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तर इतरही अनेक बसच्या सीट तुटण्याच्या अवस्थेत असल्याने परिवहन प्रशासनालाही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एका सीटची किंमत ५ हजार रुपये असून गतवर्षात तुटलेल्या सीटकरिता परिवहनला १० लाख रुपयांचा खर्च सोसावा लागला.